Home यवतमाळ टोकणशिवाय जनता दरबारात तक्रारी ? जिल्हाच्या ठिकाणी पुंगी वाजल्याची ‘गुरुदेव’ची टीका

टोकणशिवाय जनता दरबारात तक्रारी ? जिल्हाच्या ठिकाणी पुंगी वाजल्याची ‘गुरुदेव’ची टीका

156

 

यवतमाळ : पालकमंत्र्यांचा अती महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या समाधान शिबिराची तालुक्यात पुंगी वाजली. याअंतर्गत नागरिकांनी तक्रारी दाखल तर केल्या परंतु,त्यांना टोकण मिळाले नाही. एकप्रकारे प्रचंड गाजावाजा करून आयोजित केलेल्या समाधान शिबिराची जिल्ह्याच्या ठिकाणीच पुंगी वाजल्याची टीका गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली आहे.
जनहितासाठी उपक्रम हाती घ्यायचा आणि त्याची कधी नव्हे तर इतकी प्रसिध्दी करायची प्रसिद्धीच्या स्पर्धेत शासनालाही मागे टाकायचे आणि प्रत्यक्षात मात्र योजनेचे नियोजन न करता नागरिकांचा अपेक्षाभंग करायचा ही नेत्यांची जुनी चाल आहे. याचाच प्रत्यय जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समाधान शिबिराच्या नियोजनातून आली.आज जिल्हाभरातील तहसील कार्यालयात नागरिकांच्या सर्वच शासकीय तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर तक्रार दाखल केल्यानंतर दोन प्रकारचे टोकण घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र वास्तविक पाहता यवतमाळ तहसील कार्यालयात टोकण उपलब्ध नव्हते. तक्रार दाखल केल्यानंतर नागरिकांना टोकण न घेताच माघारी परतावे लागले.
उपस्थित तहसील कर्मचाऱ्यांनी टोकण नसल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली.त्यामुळे सदर शिबिरामध्ये कुठलेच नियोजन नसल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष गेडाम यांनी केला आहे.
टोकण मिळत नसल्याने नागरिकांनी गुरुदेव युवा संघापुढे संताप व्यक्त करून आपली नाराजी व्यक्त केली. यावर गुरुदेव युवा संघाच्या अध्यक्षांनी प्राप्त अर्जावर पुढील पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.