
➡️ घाटंजी तालुक्यातील तिसरी घटना.

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील करमणा (तांडा) येथील शेतकरी वसंतराव भाऊरावजी कानकाटे रा. करमणा यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील गायीचा वाघाने फडशा पाडल्याने गाय मृत्यूमुखी पडली. सदरची घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता करमणा (तांडा) येथे घडली.
करमणा (तांडा) येथील मृतक गायीचा घाटंजी येथील पशु वैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला असुन या वेळी घाटंजी येथील वन क्षेत्र सहाय्यक मनिषा दांडगे, घाटी बिटचे वनरक्षक विक्रांत बडे व चोरंबा बिटचे वनरक्षक सी. आर. हेमके आदी उपस्थित होते. सदर प्रकरणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतक गायीचा पंचनामा केला असून लवकरच वन परिक्षेत्र अधिकारी घाटंजी यांचेकडे अहवाल सादर करण्यात येत असल्याचे घाटंजी येथील वन क्षेत्र सहाय्यक मनिषा दांडगे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे टिपेश्वर येथील अभयारण्यात वाघांची संख्या अधिक झाल्याने वाघांसाठी टिपेश्वर जंगल कमी पडत आहे. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्यातील वाघ व ईतर हिंस्त्र पशू ईतर जंगलात आपली शिकार शोधण्यासाठी बाहेर पडत आहे.
या पुर्वी घाटंजी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयातंर्गत इंझाळा, पारवा वन परिक्षेत्रातंर्गत पाटापांगरा, देवधरी, रामनगर आदीं ठिकाणी वाघाने अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. विशेष म्हणजे इंझाळा (ता. घाटंजी) नर्सरी जवळ बिबट्या मृत्यूमुखी पडला होता. तसेच अनेक गावांत नागरिकांना वाघाचे दर्शन झाले होते. या मुळे घाटंजी तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांढरकवडा येथील उप वन संरक्षक यांनी घाटंजी तालुक्यातील वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.











































