
जमाअत ए इस्लामी हिंद चे आयोजन
अमीन शाह
शेगाव : देशातील सर्व धर्मीय एकता वृद्धिंगत व्हावी याशिवाय राष्ट्रीय सलोखा नांदावा या करिता जमात-ए-इस्लामी हिंद कडून वर्षभर विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी मस्जिद परिचय व ईद मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेगाव शहरातील आझादनगर भागातील मस्जिद मध्ये उद्या १५ मे रोजी मस्जिद परिचय; चला, जाणून घेऊया मस्जिदविषयी सर्वकाही..
सकाळी वा संध्याकाळी एखाद्या मस्जिदमधून सर्वदूर पोहचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा..? किंवा मस्जिदमध्ये काही विपरित होत असतं अशी आशंका ज्यांच्या मनात भेडसावत असते त्यांना थेट मस्जिदमध्ये जाऊन पहायला व विचारायला संधी मिळाली तर ? हो, अशी एक संधी महाराष्ट्रातील एकदोन नव्हे तर शेगाव सह तब्बल १०० मशिदींमध्ये देण्यात येते आहे. तिचे नाव आहे, मस्जिद परिचय. जमाअत ए इस्लामी हिंदचे च्या वतीने हे आयोजन सुरु आहे. शेगावात उद्या १५ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता शेगाव शहरातील आझादनगर भागातील हजरत उमर फारूक (रजी) मस्जिद मध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. नजर शेख हे राहणार आहेत. आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक आहेत. मात्र आपले परस्परांसोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. दुरावा आहे. गैरसमज आहेत. असं पसरवलं जातंय की, मदरसामध्ये चुकीचे शिक्षण दिले जाते किंवा मशिदीत गैरप्रकार होत असतात. या शंका, हे गैरसमज दूर व्हायला हवेत. यासाठी या कार्यक्रमाचे आयोज केल्या गेले असल्याचे शेगाव शाखा अध्यक्ष डॉ.मोहम्मद अन्सार यांनी सांगितले. तर सर्वच समाजबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शिरखुर्म्याचा हि आस्वाद घ्या असे आवाहन हि त्यांनी केले.











































