
अमिन शाह
पोलिस पित्याला पोलिस मुलीनं अत्यंत शांतपणे मारुन टाकलं,
मदतीला होता पोलिस असलेलाच प्रियकर. आरोपी पोलिस असल्या कारणनं ही घटना एक दोन नाही तर तीन वर्ष सर्वांना अपघातच वाटली. मात्र एक गोष्ट अशी काही घडली की तीन वर्षांनी हे कांड बाहेर आलं आणि स्वताच्या बापाला संपवणाऱ्या पोरीसह प्रियकर असलेला पोलिस आणि इतर दोघे आज जेलमध्ये आहेत. बापलेकीच्या नात्याला आणि एकूणच माणुसकीला काळिमा फासणारी चंद्रपूरातली ही घटना आहे, याचीच संपूर्ण गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.
एका पोलीस तरुणीनेच आपल्या वडिलांचा काटा काढल्याचे तब्बल 3 वर्षांनंतर उघड झाले असून या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली असून, यात खुद्द मृताची मुलगी आणि तिचा पोलीस दलातील प्रियकर यांचा समावेश आहे. हेड कॉन्स्टेबल जयंत बाल्लावार यांची हत्या त्यांच्याच मुलीने, आर्या बाल्लावार हिने प्रियकर आशिष शेडमाके याच्या मदतीने केली होती. ही भीषण घटना 25 एप्रिल 2023 रोजी घडली होती, परंतु या गुन्ह्याचा खरा उलगडा 23 मार्च 2026 रोजी झाला आहे. पोटच्या मुलीने प्रेमप्रकरणात पित्याचा होणारा विरोध पाहून त्यांचा बळी घेतल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी आर्या आणि आशिष यांचे प्रेमसंबंध होते, मात्र आर्याचे वडील जयंत बाल्लावार यांना या संबंधांची कुणकुण लागली होती. वडिलांनी याला कडाडून विरोध केला आणि यावरून आर्याला अनेकदा मारहाणही केली होती. वडिलांचा हा विरोध आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्याचे पाहून या प्रेमी युगुलाने त्यांचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. विष मिळवण्यासाठी आशिषने एका अल्पवयीन मुलामार्फत चैतन्य गेडाम याच्याशी संपर्क साधला. चैतन्यने 5,000 रुपयांच्या बदल्यात एका काचेच्या बाटलीत घातक विष आणून दिले. 25 एप्रिल 2023 रोजी आर्याने संधी साधून आपल्या वडिलांना मिल्कशेक मधून हे विष पाजले. मिल्कशेक पिल्यानंतर काही वेळातच ड्युटीवर असताना जयंत बाल्लावार यांना चक्कर आली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता, परंतु आर्या जणू जशी दिसते तशी पट्टीची अक्टरच. तिनं असा काही खोटा जबाब दिला की सर्वांची दिशाभूल करुन टाकली, सहानुभूतीही मिळवली. नंतर अनुकंपा तत्वावर ज्या पित्याला मारुन टाकलं त्याच्याच जागी भरतीही झाली. सोशल मिडीयावर फोटो टाकून स्वप्नपूर्तीचा आनंदही साजरा केला.
आता तीन वर्ष ही घटना म्हणजे एक अपघातच मानला गेला, सगळं व्यवस्थितच होतं एकंदरीत. मात्र आता तीन वर्षांनी या गुन्ह्याचा उलगडा झाला. याचं मुख्य कारण म्हणजे आर्या आणि आशिष यांच्यातील बिनसलेले संबंध. हत्या केल्यानंतर हे दोघेही वर्ष 2025 मध्ये चंद्रपूर पोलीस दलात अधिकृतपणे भरती झाले आणि त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. या सततच्या वादाला कंटाळून आणि भीतीपोटी आशिष शेडमाके याने स्वतःच रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन या हत्येची कबुली दिली. सुरुवातीला पोलिसांनी या अर्जाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते, परंतु जेव्हा 3 वर्षांपूर्वीच्या मर्ग रिपोर्टचे आणि वैद्यकीय अहवालाचे पुनरावलोकन केले गेले, तेव्हा जयंत बाल्लावार यांचा मृत्यू विषप्रयोगामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपी महिला पोलीस असल्याने सुरुवातीला चौकशीत गांभीर्य दाखवले गेले नाही, अन्यथा हा गुन्हा 3 वर्षांपूर्वीच उघडकीस आला असता, अशी चर्चा आता रंगत आहे.
विशेष म्हणजे ट्रेनिंगमध्ये शिस्तभंग केल्यामुळं आशिष शेडमाकेला बडतर्फ केल्याची माहिती आहे. हत्येची घटना झाली त्यावेळी दोघेही पोलिसांमध्ये भरती झाले नव्हते. आणि दोघेही आपापल्या वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावरच भरती झाले होते. आता आर्या पोलिस होती आणि आशिष पोलिस नव्हता, आर्याचे फोटो पाहता ती एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही. तिच्या सोशल मीडियावर आशिषसोबतचेही फोटो दिसत आहेत. मात्र याच आशिषनं आर्याची काळी बाजू समोर आणली, अर्थात यात तोही फसला.
आता रामनगर पोलिसांनी याप्रकरणी आशिष शेडमाके, आर्या बाल्लावार, चैतन्य गेडाम आणि एका विधिसंघर्ष बालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात जाईल कदाचित. वडिलांच्या हत्येनंतरही दोन वर्षे आरामात पोलीस दलात सेवा देणाऱ्या या आरोपींचे सत्य समोर आल्याने खाकी वर्दीची प्रतिमा मलिन झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दराडे करत असून, या हत्येमागे आणखी कोणाचे सहकार्य होते का, याचाही शोध घेतला जात आहे.













































