Home यवतमाळ अहंकार घडविणारा आहे बिघडविणारा सुद्धा आहे – ह. भ. प. युगंधरा वीरकर

अहंकार घडविणारा आहे बिघडविणारा सुद्धा आहे – ह. भ. प. युगंधरा वीरकर

421

यवतमाळ – शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आत्मा हे आपल्या अस्तित्वाचे सात स्थर त्यातही मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंलकरण चतुष्ट्यासी निगडीत आहेत. यांचे संतुलन ठेवून ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्ती योगाची साधना करुन मानवी जीवन सार्थक करण हे मानवाच्या हातात आहे. त्यासाठी मनाचं उन्मत करणं, बुद्धीची शुद्धता राखणं, चित्त निर्मल करणं आणि अहंकाराचं सुक्ष्म निरीक्षण करणं यावर अध्यात्म शास्त्राने संत महंतानी प्रबोधन केलेले आहे. यात अहंकाराच्या बाबतीत अती संवेदनशिल असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण अहंकाराने कोणालाच सोडलेले नाही. कधी घात करेल याचा नेम नाही. संतांनी यावर चिंतन केले. तुकाबारायाचं प्रमाण आहे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, ज्ञान, पत, प्रतिष्ठा, अधिकार, सौंदर्य, कार्य कुशलता ही अहंकाराची बलस्थाने आहेत. यावेळीं या प्रबळ इच्छाशक्तीने अश्यक भासणारं कार्य अहंकाराची माया थोडी वाढवून शक्य झालेली अनेक उदाहरण आपण अनुभवतो.  आवश्यकते प्रमाणे ही माया कमी अधिक करणे ही कला ज्याला जमली, मी कोण आहे? हे सत्य ज्याला उमगलं तर अहंकार तुमचा विश्वासू मित्र आहे. अहंकार घडविणारा आहे… बिघडविणारा सुद्धा आहे. असे प्रतिपादन ह. भ. प. युगंधरा वीरकर, मुंबई यांनी केले. श्री हनुमान आखाडा चौक स्थित श्री हनुमान जन्मोत्सव कीर्तन महोत्सवात तृतीय कीर्तन पुष्प गुंफताना त्यांनी एकनाथ महाराजांचा देवा माझे मन लागे तुझे चरणी या अभंगाचे साकी, दिंडी आर्या या विविध गायनाचा व समर्पक दृष्टांताचा आधार घेत सुश्राव्य कीर्तन मेजवाणी दिली. कीर्तनकाराचे स्वागत शिलाताई यादव व विमलताई डोईजड यांनी केले. मनिष अहिर यांनी संवादिनीवादक गंगाधरराव देव व तबला वादक श्रीधर कोरडे यांचे स्वागत केले. मध्यंतरात गंगाधरराव देव यांनी मना लाभो ऐसा छद…गोविंद गोविंद हा अभंग गाऊन श्रोत्यांची दाद मिळविली.

उतरार्धात अहंकाराची बाधा झालेल्या बलराम दादा, सत्यभामा आणि गरुडाला भगवान श्रीकृष्णांनी आपल्या लीलेने हनुमंताकरवी अहंकार विरहित कसे केले हे मार्मिक आख्यान सादर करुन श्रोत्यांना अंतर्मुख केले. यशस्वी आयोजनाची प्रशंषा करुन सर्व श्रोतृवंदांना श्री हनुमंताचे कृपाशिष लाभो अशी सद्भावना व्यक्त करुन त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली. आरतीचे यजमान पद सुलोचनाताई राय, अरुणजी भिसे, दिपक ठाकूर यांनी भूषविले. स्वाती सहस्त्रबुद्धे यांनी बहारदार सुत्र संचालन करुन सोहळ्यात रंग भरला.