
खालापूर….सहज सेवा फाउंडेशन ही समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी सातत्यपूर्ण कार्य करीत असते. हाती घेतलेले काम तडीस नेणे ही एक हातोटी असलेली संस्था म्हणून जनमानसात उल्लेख आहे.वंचित व उपेक्षित घटकांसाठी कार्य करण्याच्या उद्देश्यातुन ज्यांना खरच शिक्षणाची आवड आहे परंतु घरच्या परिस्थिती मुळे शिक्षण घेऊ शकत नाही, आई-वडील विटभट्टीवर मोलमजुरी करत असणाऱ्या मुलांना व खालापूर तालुक्यातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी 19 डिसेंबर 2021 पासून दर रविवारी महड व शेडवली येथे संस्थेची सहज निसर्ग शाळा सुरू आहे.समाजप्रति एक आदर्श ठरणाऱ्या या उपक्रमातून समाजास एक वेगळा संदेश मिळत आहे. संस्थेने अनाथ असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करीत असल्याने अनेक दानशूर व्यक्ती व मदतनीस संस्थेच्या कार्यात मदत करीत आहेत. या उपक्रमाची नोंद घेऊन खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांची अनियमित व स्थलांतरित विद्यार्थी समिती वर स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड केलेली आहे.तळागाळातील वंचित व उपेक्षित घटकांना याचा लाभ होईल यासाठी झालेल्या या नेमणुकीचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातील विविध घटकांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.











































