Home विदर्भ लग्नात ५०, मरणात २० पण आ. रवि राणांच्या कार्यक्रमात हजारोंचा जनसमुदाय.

लग्नात ५०, मरणात २० पण आ. रवि राणांच्या कार्यक्रमात हजारोंचा जनसमुदाय.

33
0

मनिष गुडधे

अमरावती –  एकीकडे कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी शासन प्रशासन कंबर कसून कामाला लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पथक तयार करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ५०० रुपये, तर मंगल कार्यालयांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठाण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने लग्नात ५०, मरणात २० लोकांना परवानगी देण्यात, आली आहे. मात्र खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक विनामास्क उपस्थित होते.

सामान्य माणसांना नियम आणि खासदार, आमदारांच्या कार्यक्रमाला नियम नाहीत काय, असा प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहे. कोविड व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमिवर नागरिकांना अति तातडीच्या वेळी गरजूंना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी युवा स्वाभिमानच्या वतीने स्वाभिमान महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले.बुधवारी (ता. १२) संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ३१०० रक्तदाते रक्तदान करणार याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. तरीसुध्दा मनपाच्या बाजार परवाना विभागाच्या वतीने या कार्यक्रमाला अनुमती दिली.विशेष म्हणजे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला ३२ जीबी चा एक पेन ड्राईव, पुरुषांना टीशर्ट व महिलांना साडी देण्यात येणार होती. सकाळी ८ वाजतापासूनच सांस्कृतिक भवनात गर्दी जमायला लागली.विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती. सांस्कृतिक भवनच्या आतमध्ये १२०० जणांची बसण्याची व्यवस्था असून भवन महिलांनी फुल्ल झाले होते. पुरुषांना बाहेरच उभे राहावे लागले. त्यामुळे भवनाच्या परीसराव्यतिरीक्त बाहेरही तुफान गर्दी पहायला मिळाली होती.कार्यक्रमाच्या आयोजकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम घेतला जाईल अशी हमी दिली होती, तरीही कार्यक्रमात सरसकट कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.कोरोनाच्या नियमांचे पालन व्हावे याकरीता महानगरपालिकेच्या वतीने सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत शहरभरात कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने शहरात १४४ सुध्दा लागू केली. आतापर्यंत नागरिकांच्या कडून नियमांचे उल्लंघन झाल्याने लाखों रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.विशेष म्हणजे मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे स्वतः रस्त्यावर उतरुन कारवाई करण्यासाठी उतरले होते. तरीसुध्दा कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढताना दिसून येत आहे. त्यातल्या त्यात ५० जणांची अनुमती असताना हजारोंच्या संख्येने कार्यक्रम घेतल्याने कोरोना रुग्णांचे आकडे वाढणार की कमी होणार? असा प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे.मनपाच्या वतीने नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यात आली आहे. ५० जणांची अनुमती असताना हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिसून आली. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला शोधण्यात आले. परंतु ते त्या स्थळी उपस्थित नसल्याने त्यांना नोटीस देण्यात आली- उदय चव्हाण, बाजार परवाना अधिक्षकमान्यवरांनासुध्दा मास्कचा विसर- कोरोनाला प्रतिबंध घालण्याकरिता मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. अन्यथा मनपाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. मात्र युवा स्वाभिमानच्या आज पार पडलेल्या कार्यक्रमात सामान्य माणसांनीच काय तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनीसुद्धा मास्क घातले नव्हते. नेतृत्व करणारेच जर नियमांचे उल्लंघन करीत असतील तर सामान्य माणसांनी काय करावे, असा प्रश्नसुद्धा विचारला जात आहे.