
दत्तापूरच्या श्रद्धांजली सभेत नाना पटोले यांचे प्रतिपादन.
देवानंद जाधव- यवतमाळ
घाटंजी : आयुष्यभर शेतात घाम गळणाऱ्या शेतकऱ्याने पोटाच्या लेकराइतकी प्रिय जमीन शाळा उभारणी साठी दान द्यावी आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करावे हे कार्य अलौकीक आहे. वडील स्व. नरसिंग पवार यांनी जगण्याचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्यांचा तिसरा मुलगा म्हणून मी त्यांच्या आदर्शाला स्मरत इथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहील. या यवतमाळ जिल्ह्याला लागलेला शेतकरीआत्महत्त्येचा कलंक पुसून काढण्यासाठी आपण सर्व मिळून एक दिलाने लढा उभारूया असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
दत्तापूर येथे आयोजित स्व. नरसिंग पवार यांच्या श्रद्धांजली सभेत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार आणि साहेबराव पवार यांचे वडील नरसिंग जोगाजी पवार यांचे १५ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाल्या निमित्याने दत्तापूर ग्रामवासी आणि आप्तस्वकीयांनी दिनांक २८ सप्टेंबर रोजी सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शेतकरी अनंत अडचणींमधून वाटचाल करत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. आत्महत्या हा पर्याय योग्य नाही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी केले. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला केंद्र सरकारने सोयाबीनचे दर पाडून मोठ्या संकटात लोटले आहे. बाहेर देशातून जादा भावाने सोयाबीन आयात केल्या जाते मात्र देशातील शेतकऱ्यांना भाव दिल्या जात नाही. हि केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य नागरिकांचीही लूट आहे. त्यांनी दिलेल्या कराचा हा दुरुपयोग आहे असे ते म्हणाले. स्व.नरसिंगराव पवार यांनी प्रबोधनातून लोकांना जागरूक केले. तो वारसा पुढे नेण्यासाठी आपण देवानंद पवार आणि साहेबराव पवार यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला खा.बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके, काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी आशिष दुआ, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, महंत सुनील महाराज, आमदार डॉ.संदीप धुर्वे,माजी मंत्री संजय देशमुख,माजी आमदार विजय खडसे, प्रमोद मोरे, मनीष पाटील, श्याम उमाळकर, विनायक देशमुख, शंकर नागानी, बाळासाहेब सानप, कुणाल पाटील, जीवन पाटील, तातूभाऊ देशमुख, रामविजय बुरुंगले, राहुल ठाकरे, जावेद अन्सारी, सुभाष पवार, प्रफुल्ल मानकर, संजय देरकर, वसंत घुईखेडकर, अरविंद वाढोणकर, आशिष लोणकर, गजानन बेजंकीवार, साजिद बेग, प्रकाश मानकर, विजय पाटील, विलास पाटील राऊत, राजू गावंडे,कवि हेमंतकुमार कांबळे, प्रा. विठठल आडे,शैलेश इंगोले, शालीक चवरढोल, रफिक बाबू, संजय डंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रद्धांजली कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रबोधनकार कीर्तनकार सप्तखंजेरीवाद्क सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे प्रदेश महासचिव देवानंद पवार व शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार यांचे वडील स्व.नरसिंगराव पवार यांनी आयुष्यभर बंजारा भाषेतून विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन केले. त्यामुळे त्यांना खरी श्रद्धांजली प्रबोधनाच्या माध्यमातूनच देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. स्व.नरसिंहराव पवार स्मृतिप्रीत्यर्थ भजनी मंडळांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनी साहित्य, वारकरी भजनी साहित्य, बंजारा भजनी मंडळ साहित्य भेट देण्यात आले. तसेच त्यांचे सवंगडी व सहका-यांना पोशाख वितरण करण्यात आले.










































