
सुशांत आगे – पुणे
कामाच्या पैशांवरून मारहाण करणाऱ्या सहकाऱ्याला सोडविण्यास आलेल्या तरुणाला दोघांनी पहिल्या मजल्यावरून उचलून खाली फेकून दिले. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
संजय मुरलीधर तुंवर (वय ४६) आणि रामचंद्र किसन वाघचौरे (वय ३६, रा. सुयोग निसर्ग सोसायटी, वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना वडगाव खुर्द येथील व्योमकेश हाईट्स येथे शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
क्राईम डायरी
याप्रकरणी मंतजिर हासिफ आलम (वय २१, रा. वडगाव खुर्द) यांनी सिंहगड रोड येथे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, व्योमकेश हाईटस येथील बांधकाम साईटवर फिर्यादी
यांचा सहकारी जुनेद याला आरोपी कामावरून व पेमेंटवरून मारहाण करीत होते त्यावेळी फिर्यादी हे भांडणे सोडविण्यासाठी गेले. फिर्यादी यांनी आरोपींना तुम्ही कामाबाबत आमचे ठेकेदार जावीर यांना सांगा, असे सांगितले. त्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी चिडून फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनी फिर्यादीला जबरदस्तीने ओढत जिन्याने पहिल्या मजल्यावर नेले. त्याठिकाणी मारहाण करून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खाली फेकून दिले. सिंहगड रोड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.











































