Home विदर्भ अंगणवाडी चा पोषण ट्रॅकर अँप तात्काळ मराठीत उपलब्ध करा – मनसेचे यवतमाळ...

अंगणवाडी चा पोषण ट्रॅकर अँप तात्काळ मराठीत उपलब्ध करा – मनसेचे यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन….

360

अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकांवर दबावतंत्राचा वापर….

यवतमाळ – गेल्या एप्रिल महिन्यापासुन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्‍यांसाठी महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहारासाठी पोषण ट्रॅकर अॅप मोबाईल वर उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत सदर अॅप डाऊनलोड करुन अंगणवाडी विषयक माहिती शासनाला पाठविण्याचे आदेश काढलेले आहे. परंतु सदर अॅप हे इंग्रजी भाषेत असुन बहुतांश अंगणवाडी सेविका पाहिजे त्या प्रमाणात इंग्रजी भाषेशी परीचीत नसल्यामुळे सदर अॅपमध्ये माहिती पुर्णपणे भरु शकत नाही. त्या अनुषंगाने या अॅपमध्ये महाराष्ट्र राजभाषा आणि त्या अंतर्गत राजभाषा सुधारणा अधिनीयम २॰॰५ नुसार मराठी मध्ये उपलब्ध करुन द्यावा जेणेकरुन शासनाला अंगणवाडी स्तरावरची माहिती पुरविण्यासाठी कमचाऱ्‍यांना सोईचे होईल.अश्या स्वरूपाचे मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

शासनाने पुरविलेल्या बहुतांश मोबाईलवर पोषण ट्रॅकर अॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना व्यक्तीगत मोबाईल मध्ये पोषण ट्रॅकर अॅप डाऊनलोड करावा लागत आहे. ज्याद्वारे भरण्यात आलेली माहिती ही शासनाच्या डॅशबोर्डवर जात नाही. सोबतच अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या पोषण ट्रॅकर अॅपमध्ये इंग्रजी भाषेत माहिती भरता येत नसल्यामुळे त्रयस्थ व्यक्तीकडून माहिती भरुन घ्यावी तसेच आपण या संदर्भात कुठल्याही कामात कुचराई केल्यास आपल्याला सेवेतुन बडतर्थ करण्यात येईल. अशा स्वरुपाचा दबाव वजा धमकी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणुन यवतमाळ जिल्ह्यात दोन अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या दबावा पोटी आत्महत्या केली असल्याचा आरोप या प्रसंगी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी केला.ह्या गंभीर विषयाची मा. राजसाहेब ठाकरे यांना माहिती देण्यात आली असून लवकरच यावर मा.मुख्यमंत्री यांच्याशी ते या विषयावर बोलणार आहेत.या प्रसंगी अंगणवाडी सेविकेंच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्या.त्रयस्थ व्यक्तीने इंग्रजीत भरलेली माहिती त्या अंगणवाडी सेविकाला वाचता येत नाही. या दरम्यान एखादी चुक झाल्यास जबाबदार अंगणवाडी सेविकाला धरण्यात येते. ग्रामिण भागात मोबाईलला नेटवर्क न मिळणे, मोबाईल चांगल्या प्रतिचा नसने यासह इतर समस्यांना अंगणवाडी सेविकांना तोंड द्याव लागत आहे. एकीकडे आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाहाचा प्रश्न तर दुसरीकडे आपल्या रोजगारीचा प्रश्न अशा दुविधा मनस्थितीत महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका काम करीत आहे. याउपर शासनाचे वरीष्ठ अधिकारी जिल्हा पातळीच्या अधिकाऱ्‍यांवर दबाव तंत्र वापरतात आणि हे अधिकारी या सर्व सामान्य अंगणवाडी सेविकांवर वरीष्ठांचा दबाव असल्याचा धाक दाखवत त्या मोबाईलद्वारेच काम करण्यास भाग पाडतात. एबाविसे योजनेच्या अधिकाऱ्‍यांचे हे कृत्य बेकायदेशीर, नियमबाह्य व दांडगाईचे असुन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा नियमा अंतर्गत त्यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. तसेच केंद्र शासनाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने इतर भाषेत प्राप्त होणाऱ्‍या माहिती बाबतचे दस्ताऐवज संबंधीत विभागाने मराठीतुन अनुवादीत करणे अपेक्षीत आहे. मराठी राजभाषेचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या ११/७/१९८६ च्या शासकिय निर्णयान्वये लेखी ताकिद देणे, गोपनिय अहवाल नोंद करणे, ठपका ठेवणे व एका वर्षा करीता पुढील वेतनवाढ रोखणे इत्यादी कार्यवाही करण्याच्या सुचना असुन सुध्दा महाराष्ट्रामध्ये मराठी अॅपचा आग्रह धरणाऱ्‍या अंगणवाडी सेविकांवरच कार्यवाहीचा बडगा वरीष्ठ अधिकारी उगारतांना दिसत आहे.मनसेने या प्रसंगी एबाविसे योजने अंतर्गत पोषण ट्रॅकर अॅप मराठी राजभाषेतुन उपलब्ध करुन द्यावे तसेच सुधारीत माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने संबंधीत पोर्टल तात्काळ मराठी भाषेत करावे. आणि शासनाने एबाविसे योजनेच्या ज्या अधिकाऱ्‍यांनी अंगणवाडी सेविकांवर दबाव टाकुन त्यांना मानसिक त्रास दिला त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन फौजदारी गुन्हे दाखल करावे. आणि या दबावापोटी आत्महत्या करणाऱ्‍या अंगणवाडी सेविकांच्या मृत्युस जबाबदार अधिकाऱ्‍यांवर सदोष मनुष्य वधाचे तात्काळ गुन्हे दाखल करावे. अशा स्वरुपाचा निवेदन वजा इशारा या महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने देण्यात येत आला संबंधित निवेदनावर येत्या ८ दिवसात कार्यवाही न झाल्यास मनसे च्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या न्यायी हक्कासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलनाची भुमिका मनसेच्या वतीने घेण्यात येईल. अशा इशारा जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी दिला.या प्रसंगी प्रामुख्याने सादिक शेख, विकास पवार, सचिन येलगंधेवार, दिपक आडे, अभिजित नानवटकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.