Home महत्वाची बातमी रियालिटी शोज आणि मुलांचं उद्धवस्त होणारं भविष्य….!

रियालिटी शोज आणि मुलांचं उद्धवस्त होणारं भविष्य….!

336

गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मुलांच्या गायनाचे कार्यक्रम दाखवले जातात.ते *रियालिटी शो* म्हणून खूप लोकप्रिय देखील आहेत. *लिटिल चॅम्प* हा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून अनेक मुलं ,मुली सहभागी होत असतात.वरील उल्लेख केलेल्या नावांपैकी *ग्रँड फिनाले* हा देखील कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. वरील कार्यक्रमांची नावे जरी भिन्न असली तरी लहान मुलांच्या गायन स्पर्धा व त्यात त्यांनी मिळवलेले नैपुण्य आणि प्रत्येक फेरीला त्यांना मिळणाऱ्या श्रेणी व त्यातून ठरणारा त्यांच्या गायनाचा दर्जा ..या अंतिम टप्प्यापर्यंत अशा शो चा हा प्रवास ठरलेला असतो. जो मुलगा अंतिम फेरीत चांगले नैपुण्य दाखवेल, त्याला परीक्षक खूप दाद देतात, त्याचे प्रेक्षकही खूप कौतुक करतात, आणि दुसरीकडे इतर स्पर्धक मुले चक्क त्या व्यासपीठावर रडतात.मात्र हे डोळ्यासमोर घडत असताना आपले सो कॉल्ड सेलिब्रिटी परीक्षक तोंडातून एक अवाक्षर देखील काढत नाहीत.केवळ स्पर्धक मुलेच नाही तर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पालक देखील रडत असतात.आणि नंतर हे सेलिब्रिटी त्या कमी पडलेल्या स्पर्धकांना उपदेशाचे डोस पाजत असतात.केवळ मुलांनाच नव्हे, त्यांच्या आईवडिलांना देखील उपदेशाचे डोस ही मंडळी पाजत असते.विशेष म्हणजे आपण कवडीमोल किमतीचे आहोत, अक्कलशुन्य आहोत अशा अपराधी भावनेने ते पालकही सेलिब्रिटी लोकांचे मुकाट्याने एकूण घेतात. प्रत्येक शो चे असे मूल्यांकनाचे मापदंड निरनिराळे आहेत. अर्थात लहान मुलांमध्ये गायनाची क्षमता किती मोठी आहे, त्यातून त्यांची प्रगल्भता समोर येते, हा भाग जरी खरा असला तरी त्याच्या मनावर हे ठासून बिंबवले जाते की तू या स्पर्धेत हरला आहेस,तुला आणखी तयारी करायला पाहिजे.हे त्याला नंतर सांगितले जाते.तोपर्यंत त्याचे मानसिक खच्चीकरण जे व्हायचे ते होऊन गेलेले असते.नंतर तो पुढे किती तयारी करतो, गाण्यात तो किती निपुण होतो, की होत नाही , आणि नाही झाला तर तो जीवनात यशस्वी झाला नाही असे समजावे का ? गायन फक्त स्पर्धेत टिकण्यासाठीच असते का ? या प्रश्नांची उत्तरे देण्याचे नैतिक कर्तव्य कानाला माईक लावून ऐकणाऱ्या परिक्षकांचे आहे .किंवा भविष्यात त्या मुलाच्या जीवनात केवळ नकारार्थी विचारांनी काहूर माजविले तर त्याचीही नैतिक जबाबदारी परिक्षकांची आणि कार्यक्रम आयोजकांची आहे, हे ध्यानात घ्यायला हवे.आणि पालकांनीही अशा सुमार कार्यक्रमात आपली मुलं सहभागी करून का स्वतःआपली फटफजिती करून घ्यावी? कारण जे या लहान मुलांचे परीक्षण करतात त्यांच्या डोक्यात खूप हवा भरून गेलेली असते त्यामुळे ते वाट्टेल तसे बरळत असतात .आपणच सर्वोत्तम गायक असा यांचा समज असतो, अर्थात हा विषय आणखी वेगळा आहे. त्यावर स्वतंत्र प्रकरण होईल.असो, पण मुलांच्या भावविश्वात आपण जेव्हा जातो, तेव्हा त्यांच्या भूमिकेत जाऊन त्या खेळाची मजा लुटायची असते.मुलं जेव्हा आपसात खेळतात, म्हणजे जेव्हा त्यांची ,त्यांची स्वतंत्र खेळतात, तेव्हाही त्यांच्यात खेळाची स्पर्धा असतेच असते. पण फरक एवढा मोठा आहे की त्या स्पर्धेत जर ते हरले तर रडत नाहीत, उलट आनंदाने तो पराभव मान्य करतात. आणि एवढेच नव्हे तर आपल्या खेळातील सवंगड्याला पुन्हा खेळण्यासाठी आग्रह धरतात.स्पर्धा ही आहे आणि स्पर्धा ती पण आहे कोणती अधिक निकोप आहे, हे कोणीही सांगेल,.असाच खेळ ग्रामीण मातीतील कुस्तीचा आहे, त्यात तर लहान मोठ्या पासून अनेक पहिलवान कुस्त्या खेळतात.एक खेळाडू दुसऱ्याला चितपट करतो.पण ज्याला चितपट केले तो पराभूत झालेला पहिलवान जो जिंकला त्याला उचलून घेतो आनंदाने!ही मजा आहे स्पर्धेतली.जेवढी जिंकण्यात मजा तेव्हढी हरण्यातही मजा आहे हार-जितीचे हे खेळ मोठया आनंदाने खेळले जातात.पण अलीकडे त्यात मोठी व्यावसायिकता घुसल्याने त्यातील साधनेचा अधःपात होत आहे. साधनेला नव्हे तर सादरीकरणाला महत्व प्राप्त झाले आहे. व त्यातून लहान मुलांचे भवितव्य काळवंडून जात आहे.गायनाच्या स्पर्धा घेऊ नये असे नाही.अगदी भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्यातही स्पर्धा झाल्या आहेत, पण त्यात केवळ आनंद होता. आनंद निर्मितीसाठीच त्याचे आयोजन केले जायचे. थोडक्यात काय तर कलेत शिरलेला बाजार कुठेतरी बंद झाला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की मुलींचे गायन .मुलींच्या गायनाचा विचार केला तर भक्तीगीत किंवा सुगम संगीतही मुली गातात पण अलीकडे लावणी गीत सादर करणाऱ्या बहुतांशी मुली दिसत आहेत. आता कुणी असेही म्हणेल की मग लावणी मुले कशी म्हणू शकतील पण तसा म्हणण्याचा अर्थ नाही.मुलीच्या वयाला साजेशी गाणीच त्या ठिकाणी म्हंटली गेली पाहिजे. अलीकडे बऱ्याच स्पर्धेत अगदी कमी वयाच्या म्हणजे सात -आठ वर्ष वयाच्या मुलींकडून *मला जाऊद्या ना घरी आता वाजले की बारा* असे गाणे म्हणून घेतले जात असेल आणि त्याला टाळ्या पडत असतील तर काय म्हणावे? आता उठ-सूट मुलांच्या करियरचा मक्ता घेतलेल्या व वेगवेगळ्या क्लासेस मध्ये मुलाचा मुडदा गाडणार्या पालकांना ही भाषा समजणार नाही, त्यामुळे त्यांचे उद्बोधन करणे हा हेतू मुळीच नाही.एका शो मध्ये अशीच लहान मुलगी लावणी गात होती आणि त्या स्पर्धेची परीक्षक एक लावणी नृत्यांगनाच होती. आयोजकानी उद्दामहून तिला आमंत्रित केले होते. त्याच कार्यक्रमात त्या मुलीला लावणी गाताना पाहून ती परीक्षक म्हणाली, लहान मुलगी आहे ती, तिच्या तोंडून हे गीत नको.कारण त्या गाण्यात जी नजाकत आहे, ती सादर करण्याचे किंवा ती नजाकत गाण्यात उतरविण्याचं त्या मुलीचं वय नाही.ती लावणी तरुण बाईनेच म्हटली पाहिजे. असा सल्ला या परीक्षक महिलेने दिला. आणि दुसरीकडे आजचे परीक्षक तर बेभान होऊन जातात, मुलींचे गाणे एकूण. कलेच्या नावाखाली असे कसे चालेल? आता कुणी असेही म्हणतील की ही तुमची दहशत नाही का ? तर यात कुणी काहीही समजा परंतु मुलांच्या भावविश्वात हात घालताना खऱ्या खोट्याचा निवाडा केला पाहिजे. समाजात कलेच्या नावाखाली चालणाऱ्या उथळ आणि बाजारू गोष्टींची जाणीव त्याना करून दिली तरच बाहेरचे कुणी बाजारबुनगे त्यांच्या चांगुलपणावर घाव घालणार नाहीत.

प्रा.अमर ठोंबरे, नाशिक
पत्रकार संरक्षण समिती, नाशिक
जिल्हा समन्वयक
इमेल- amarmthombare@gmail. com