Home मराठवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकताच… आरोग्य विभागाची उडाली भांबेरी

प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकताच… आरोग्य विभागाची उडाली भांबेरी

511

वडिगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकताना पंचायत समितीचे सभापती बापुराव खटके ,मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बोंबले, गणेश नाझरकर, विष्णु खटके, अशोक बनकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी रुग्ण आले असता तिथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती.कोरोनामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या रुग्णांवर उपचार होणे आवश्यक आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले.

वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी आहेत.परंतु गेल्या काही दिवसापासून डॉ.सुशील जावळे हे कोरोनाबाधित असून ते अजून रुजू झाले नाही.तसेच डॉ.मीरा सावंत यांच्या आई आजारी असल्याने त्या देखील रजेवर आहेत.त्यामुळे दोन्ही वैद्यकीय अधिकारी नसल्याने आलेल्या रुग्णावर उपचार कोण करेल,असा प्रश्न निर्माण झाला होता.तेव्हा संतप्त रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा निश्चय केला.

तेव्हा नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांना भ्रमणध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी ताबडतोब जामखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.एस.देशमुख यांना पाठविले.परंतु ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.त्यांनी जोपर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी येत नाही.तोपर्यंत तुम्हाला येथे थांबावे लागेल.अशी अट घातली.तेव्हा डॉक्टर यांनी ही अट मान्य करत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कुलूप उघडण्यात आले.तेव्हा रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती बापूराव खटके,मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके,ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बोंबले,अभिजित खटके,विष्णू खटके,गणेश नाझरकर,अशोक सोलनकर,अशोक बनकर यांच्यासह मोठया संख्येने परिसरातील रुग्ण उपस्थित होते.

*हे वाचा*
———————–

वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ आरोग्य सह्ययक पुरुष,२ आरोग्य सेविका,२ परिचर अशा रिक्त जागा आहे.त्यामुळे यांच्या अतिरिक्त कामाचा भार हा नियमित कर्मचाऱ्यांवर पडत आहेत.सद्या परिसरात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असताना आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आला आहे.त्यामुळे या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

*हे पण वाचा*
——————–
वडीगोद्री व शहागड हे दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रे धुळे-सोलापूर व जालना-बीड या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अतिदक्षता केंद्रात समावेश आहे.वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१ गावे संलग्न असून नालेवाडी,टाका,शहापूर,डोनगाव,भांबेरी अशी ५ उपकेंद्रे आहेत.तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३५ हजार लोकसंख्या आहे.