Home विदर्भ संचारबंदीची अंमलबजावणी कडक करावी

संचारबंदीची अंमलबजावणी कडक करावी

361
0

नियमांचे पालन न करणाऱ्या दुकाने आणि नागरिकांना दंड करावा

वर्धा:- राज्यशासनाने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत दिलेल्या नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यासाठी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. मात्र तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांची वेळ कमी करत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिलेत.

जिल्हाधिकारी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अधिकारयांशी संवाद साधला, यात पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले सहभागी झाले होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी कोविड परिस्थिती आणि संचारबंदीचा आढावा घेताना कंटेंटमेंट झोनमध्ये कडक अंमलबजावणी करण्यासोबतच बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी करण्याच्या सूचना दिल्यात. दुकानांमध्ये कोविड नियमांचे पालन होत नसल्यास दुकाने सील करून दंड आकारण्याचे आदेश त्यांनी दिलेत.

वर्धा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांच्या वेळात बदल

रस्त्यावरील गर्दी कमी होण्यासाठी किराणा, भाजी, फळे, मांस, अंडी मासे अशी अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरू राहतील.वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा नियमित सुरू राहतील तसेच खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट येथून पार्सल सेवा, दूध संकलन केंद्र, दूध घरपोच वितरण सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार। याबाबत कडक अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी दिलेत.