Home विदर्भ “न्याय आपल्या दारी” हे ब्रीद जनमानसात रुजवा – न्या. किशोर पेठकर

“न्याय आपल्या दारी” हे ब्रीद जनमानसात रुजवा – न्या. किशोर पेठकर

115
0

जिल्हा न्यायालयात पॅरा विधी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण….

यवतमाळ – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांसाठी पॅरा विधी स्वयंसेवक म्हणून दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी केले. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव न्यायाधीश एम.आर.ए.शेख, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप नगराळे, निवृत्त न्यायाधीश विलास घोडचर तसेच अ‍ॅड. अजय चमेडिया मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना न्यायाधीश किशोर पेठकर यांनी पॅरा विधी स्वयंसेवकामार्फत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत कशी पोहचवता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ‘न्याय आपल्या दारी’ हे ब्रिद लक्षात घेता गरजुंपर्यंत कायदेविषयक सेवा पोहचविण्याचे आवाहन केले. न्यायाधीश एम.आर.ए.शेख यांनी लिगल सर्विसेस ऑथोरीटी अ‍ॅक्ट बद्दल मार्गदर्शन केले. डॉ. संदीप नगराळे यांनी माहितीचा अधिकार कायदा, कामगार कायदे तसेच अ‍ॅट्रोसिटी कायद्यावर मार्गदर्शन केले. निवृत्त न्यायाधीश घोडचर यांनी वरिष्ठ नागरीकांच्या कायद्याच्या अनुषंगाने माहिती दिली तर अ‍ॅड.अजय चमेडिया यांनी फौजदारी कायद्यातील तरतुदींचे विश्लेषण केले.

दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरामधे वेगवेगळ्या कायद्याबांबत विधिज्ञांनी मार्गदर्शन केले त्यामधे निलेश खंडारे, देवेंद्र राजूरकर, प्राची निलावार, रविंद्र सोनटक्के, सुप्रीया रोकडे ,संदीप गुजरकर , एम.बी.बेतवार आदी विधिज्ञांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. सागर उदापुरकर ह्यांनी तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. अजय दानी ह्यांनी पार पाडले. सदर शिबिराच्या यशस्वीततेसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.