
मजहर शेख, नांदेड
पथनाट्याद्वारे लोकप्रबोधन : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम.
नांदेड/किनवट,दि : ८ : – प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड आणि फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बळीरामपूर ता.जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या 32 व्या ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत शहरातील जुन्या नगर परिषदेच्या प्रांगणात सोमवारी (दि.08) ‘निळ्या आकाशातील लाल वादळ’ या कलामंचातर्फे सादर केलेल्या पथनाट्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती तसेच अपघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणती सावधगिरी बाळगावी यासंबंधी जनजागृती करण्यात आली.
संपूर्ण नांदेड जिल्हामध्ये 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 32 वे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यातील सोळा तालुक्यात भ्रमंती करीत उपरोक्त कलामंचातील कलाकारांच्या साहाय्याने विविध महाविद्यालयात, शहरातील मुख्य चौकात पथनाट्य सादर करीत दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर, चारचाकीत बसलेले असतांना सीट बेल्टचे महत्व, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर टाळणे, शालेय बसमधून प्रवास करतांना मुलांनी घ्यावयाची काळजी अशा अनेक बाबींवर उचित नाट्यमय प्रसंग उभे करून लोकप्रबोधन करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्याने आपण किती तरी अपघात टाळू शकतो हे पटवून देण्यात येत आहे. सर्व वाहन धारकांना ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे सूत्र समजावतांना आणि वाहतुकीच्या नियमांचे संदेश देतांना प्रत्येक शहरात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे फकीरा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष तेलंग व सचिव तथा मार्गदर्शक साईप्रसाद जळपतराव यांनी सांगितले.
गत वीस-बावीस दिवसापासून जिल्हाभर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रभावी जनजागृतीसाठी उपरोल्लेखित कलामंचाचे मुख्य गायक माधव वाघमारे, प्रसिद्ध गायिका सविता गोदाम, तबलावादक संभाजी आरलेवाड, बाबुराव नामेवार, दत्ता पोटलेवाड, अनिल वाघमारे, साहेबराव वाघमारे, रूपा गडमवार, सारिका तपासकर आदी कलावंत परिश्रम घेत आहेत. तसेच या अभिनव उपक्रमाची नागरिकही ठिकठिकाणी प्रशंसा करीत आहेत.











































