Home जळगाव चाकूच्या धाकावर 23 लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार ,

चाकूच्या धाकावर 23 लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार ,

115
0

 

दरोडेखोरांच सर्वत्र शोध सुरू

जळगाव प्रतिनिधी ,

जळगावमध्ये दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूच्या धाकावर 23 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी 3 लाख रुपये रोख आणि 20 लाखांचे दागिने असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला.

3 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास शहरातील मोहाडी रोड परिसरात दौलतनगर येथे ही घटना घडली. पिंटू बंडू इटकरे (वय 35) यांच्या घरात हा दरोडा पडला. पिंटू इटकरे हे पत्नी मनीषा आणि तीन वर्षांची मुलगी हरीप्रिया यांच्यासोबत राहतात. इटकरे यांचा लोखंडी रॉडचा होलसेलचा व्यवसाय असून ट्रेडिंग कंपनी आहे. पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास तोंडाला मास्कसह रुमाल बांधलेले तसेच हातात धारदार शस्त्र असलेले सहा जण कटरने लाकडी दरवाजा कापून आतील कडी उघडून इटकरे यांच्या दुमजली घरात घुसले. घरात झोपलेल्या सदस्यांना उठवून चाकूचा धाक दाखवत आणि ‘घरात जे असेल ते काढून द्या’ असं धमकावत दरोडेखोरांनी घरातील तीन लाखांची रोकड व दागिने काढून घेतले. परत जाताना दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल तसेच घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर बॉक्सही काढून नेला. तसेच पोलिसांना प्रकार कळवला तर आम्ही पुन्हा येऊ तसेच तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकीही दिली. ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाइल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला.
नंतर, घाबरलेल्या इटकरे दांम्पत्याने नातेवाईकांना प्रकार कळवला व सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रामानंद नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.