Home बुलडाणा चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत ला चोरट्यांनि जबरी चोरी करीत लुटला 4 लाख...

चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत ला चोरट्यांनि जबरी चोरी करीत लुटला 4 लाख 32 हजारांचा ऐवज, 3 संशयीत ताब्यात

222
0

प्रा.तनजीम हुसैन
चिखली : तालुक्यातील पळसखेड दौलत येथील उमेश गायकवाड यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत घरामध्ये असलेले 2 लाख 85 हजार नगदी तसेच जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 32 हजार रूपयांचा जबरी चोरी करीत असतांना ज्योती गायकवाड यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला शस्त्राचा धाक दाखवून पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटना ता.10 जानेवारीच्या मध्यरात्री घडली.
यासंदर्भात सौ.ज्योती उमेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 10 जानेवारीच्या रात्री झोपेतून अचानक जाग आल्याने त्या आपल्या सासु-सासर्‍यांच्या हॉलमध्ये आले असता त्यांना एक अनोळखी इसम सासुच्या उशाला बसलेला दिसून आला. तेव्हा तिला संशय आल्याने तिने आरडाओरडा सुरूवात केली असता दुसरा तिच्या अंगावर धावून गेला, तिला शस्त्राचा धाक दाखवत गप्प केले आणि तिथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी घराची झाडाझडती घेतली असता घराच्या मागील बाजुचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे त्यांना निदर्शनास आले तसेच हॉलमध्ये ठेवलेल्या अलमारीमधील नगदी 2 लाख 85 हजार रूपये व सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तर त्यांच्याशेजारी राहणारे मदन गायकवाड यांच्या घरातील देखील चोरट्यांनी हात साफ केल्याचे आढळून आले आहे. चोरी झालेल्या रात्रीदरम्यान उमेश गायकवाड हे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. उमेश गायकवाड हे चिखलीतील मुंगसाजी महाराज सूतगिरणीमध्ये इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतात.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत तपासकामी श्वानपथकाला पाचारण करून तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय अधिकारी रमेश बरकते हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास करीत तपासपथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसोशीने चौकशी सुरू केली आहे. उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.