Home विदर्भ गोरगरीब माणसाचे अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्पर्धा करावी – क्रीडा मंत्री सुनील केदार

गोरगरीब माणसाचे अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्पर्धा करावी – क्रीडा मंत्री सुनील केदार

109

ईकबाल शेख

वर्धा –  लोकप्रतिनिधींनी गोरगरीब, रंजल्या- गांजल्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी स्पर्धा करावी. त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे, केवळ नाव फलकावर लावण्यासाठीची स्पर्धा लोकशाहीला घातक ठरते,

असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री सुनील केदार यांनी देऊरवाडा आर्वी रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले.

आर्वी येथे नगरपरिषद चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अमर काळे, नागोरा लोंढे, गुणवंत बनसोडे, छोटुभाऊ, उपस्थित होते. श्री केदार यावेळी बोलताना म्हणाले, या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यावर राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधा, धान्यपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घेतानाच जिल्ह्यात कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. एप्रिल व मे या दोन महिन्यात नवीन 9 हजार शिधापत्रिका वितरित केल्यात. यामुळे गोरगरिबांच्या, परितक्त्या महिलांच्या घरात कुणीही उपाशी झोपण्याची वेळ आली नाही.

हा जिल्हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हे सांगताना त्यांनी अमरावती जिल्ह्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातही कॉटन क्लस्टर निर्माण करण्यात येईल असे सांगितले. आर्वी परिसरात अशा पद्धतीचे कॉटन क्लस्टर तयार करण्यात येईल. यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणारे जिनिंग व तयार झालेल्या कापूस गाठींना बाजारपेठ उपलब्ध होऊन येथील शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा मिळेल. शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी आणि शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते निर्माण करून देणे या दोन गोष्टी या जिल्ह्यात पुढील एक वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून घेतला आहे. सिंचन विहिर धडक योजनेचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध होतील अशी ग्वाही श्री केदार यांनी यावेळी दिली.

लोकांवर अन्याय करणा-या सरकारचे दिवस आता गेले असुन कायदे हे लोकांसाठी असले पाहिजेत. लोक कल्याणकारी कायद्यांसाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. जेव्हा सर्वसामान्य जनतेला कायदे अडचणीचे वाटतात तेव्हा पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीशी उभा राहील. जनतेच्या खांद्याला खांदा लावून त्या कायद्याच्या विरोधात लढायला तयार असेल अशी हमी त्यांनी यावेळी बोलताना दिली. याप्रसंगी अमर काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.