
आष्टी (शहीद):- रविंद्र साखरे
वर्धा – आष्टी येथील जुने बस स्टॅन्ड परिसरात वास्तव्यास असणारे तसेच सेवा निवृत्ती नंतर स्वतःला समाज कार्यात झोकून देऊन सामाजिक उपक्रम कार्यक्रमात सदैव अग्रेसर असणारे शिक्षक हिरामण तुकाराम शियाले वय-62 यांचे आज दिनांक 27 डिसेंबर 2020 रोजी अंतोरा येथे जात असताना दुपारी 11:00 वाजता दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर माहिती याप्रमाणे की सेवानिवृत्त शिक्षक हिरामण तुकाराम शियाले हे आष्टी वरून अंतोरा येथे जात असताना लहान आर्वी ते अंतोरा या मार्गात पांढुरंग महाराज मंदिरा जवळ एका वळणावर अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली. व सदर वाहन हे घटनास्थळावरून पसार झाले. धडक एवढी गंभीर होती की यात शियाले सर यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली त्यांना तात्काळ उपचाराकरिता खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेंच त्यांना उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आले आहे.त्यांच्या अशा अपघाती जाण्याची वार्ता आष्टी शहरात वाऱ्यासारखी पसरताच लोकांची गर्दी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे मोठ्या प्रमाणात वाढली होती तसेच आष्टी परिसर शोकसागरात बुडाला. त्यांचा जीवन प्रवास जिल्हा परिषद शिक्षक ते अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यातून समाज घडविणे या प्रकारचा राहिला त्यांच्या मागे पत्नी मुलगा, सून, 2 मुली जावई असा आप्त परिवार आहे.










































