Home नांदेड मदनापूर/करळगाव ग्रा.प. रेकॉर्ड तपासनी प्रक्रिया थंड बस्त्यात!

मदनापूर/करळगाव ग्रा.प. रेकॉर्ड तपासनी प्रक्रिया थंड बस्त्यात!

48
0

मजहर शेख, नांदेड

आदेशांवर आदेश तरीही चौकशी मात्र होईना, नागरिक संभ्रमात

नांदेड/माहूरर,दि: २२:- १०० टक्के पेसा क्षेत्र असलेल्या मदनापूर करळगाव ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत नागरिकांना संशय असल्याने काही जागरूक नागरिकांनी दि. १० सप्टेंबर २०२० रोजी ग्रामपंचायतचे रेकॉर्ड तपासणी करण्याची लेखी निवेदनाव्दारे मागणी केली होती. सदर प्रकरणात गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांनी चौकशी समिती सुद्धा नेमली होती. परंतु सदर समितीने अद्याप चौकशी केली नसल्याने सदर प्रकरणात काय गौडबंगाल झाले याबाबत नागरिकातून शंका उपस्थित झाल्याने माहूर पंचायत समिती मध्ये अंधळ दळतय अन कुत्र पीठ खातायचा प्रत्यय येत आहे. परिणामी मदनापूर ग्रा.प. अविकसित गावाच्या यादीत पहिला क्रमांक पटकावण्याच्या स्पर्धेत असल्याचे नागरिकातून उपहासात्मक बोलल्या जात आहे.

मदनापूर ग्रा.प. मध्ये अनेक गैरकारभार होत असल्याची सातत्त्याने ओरड होत असते काही विकासप्रेमी नागरिक गटविकास अधिकारी ते मु.का.अ.जि.प. पर्यंत लेखी निवेदने सादर करीत असतात. मात्र आजतागायत अनेक निवेदने केराच्या टोपलीत जाऊन बसल्याची गंभीर बाब घडली आहे. मनसेता.उपाध्यक्ष अन्नमवार यांच्या तक्रारीबाबत पण तोच कित्ता गिरविला असल्याचे दिसत असून महत्वाची बाब अशी की सदर निवेदनाच्या चौकशीचे आदेश सुद्धा निघून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना केल्यानंतरही सदर बाब थंड बस्त्यात पडली आहे.

करळगाव येथील जागरूक नागरिक गजानन मन्सबराव पेंदोर व मदनापूर येथील राजू पुंडलिकराव टनमने यांनी दि.२३ ऑक्टोबर २०२० रोजी गटविकास अधिकारी पं.स. माहूर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मदनापूर ग्रा.प.च्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली असून त्यामध्ये सन २०१८ ते २०२० चौदाव्या वित्त आयोगातील निधी तून कोणती विकास कामे करण्यात आली. सन २०१८ ते २०२० गृहकर पासून ग्रा.प. ला किती उत्पन्न मिळाले व कोणत्या विकासकामी खर्चे झाले. ग्रा.प.चे चेकबुक, पासबुक व जमाखर्च तपासणी गावठाण लीलावाची रक्कम बँकेत ग्रा.प. खात्यात जमा केली काय, प्रत्येक कामाचे अंदाजपत्रक तपासणी व जायमोक्यावर पंचनामे करणे, स्वस्त धान्य दुकानच्या अंत्योदय यादीत १८ ते २० लोकांचा समावेश केला. सन २०१८-२०२० मध्ये किती नागरिकांना लाभ देण्यात आला. आदी बाबीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीबाबत गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही.आर. आरबडवार, व विस्तार अधिकारी डी.व्ही.जोगपेठे यांना दि. ०३/११/२०२० रोजी जा.क्र.२३२०,२३२१ अन्वये आदेशित करून सात दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. परंतु अद्याप पर्यत सदर प्रकरणाची चौकशी झाली नसल्याने सदर आदेश लालफीतशाहीत अडकल्याचे बोलल्या जात असून याउपरही सामाजिक कार्यकर्त्यांनी दि.१० डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी पं.स. माहूर यांना स्मरणपत्र देऊन चौकशीची मागणी केली असली तरी अद्याप सदर प्रकरणाची चौकशी झाली नसल्याने माहूर पं.स. चा कारभार आओ चोरो बांधो भारा आधा तेरा या उक्तीचा अवलंब करत असल्याचे नागरीकातून बोलल्या जात आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माहूर. पं.स. समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.पूर्वीच्या चौकशी प्रमाणे हि चौकशीही थांबणार की दुध का दुध पाणी का पाणी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.