
नांदेड , दि. १५ :- कामगार कार्यालय विभागाच्या वतीने राज्यातील तसेच नांदेड जिल्ह्यातील असंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते आहे. ही नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ घेता येतो. मात्र मनपा सिडको विभागा अंतर्गत येणारे काही कर्मचारी तसेच लुबाडणारी गुत्तेदार मंडळी यांच्या साठलोठ करीत कामगार बांधवांची विविध कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण पुढे करत आर्थिक पिळवणूक केली जाते आहे. यावर अंकुश घालण्याचे निवेदन शशीकांत गाडे पाटील यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिले आहे.
असंघटित कामगार वर्ग यांना शासनामार्फत विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी कामगार नोंदणी कामगार विभागाच्या वतीने केली जाते. बांधकाम कामगार नोंदणी करिता बांधकाम गुत्तेदार यांचे शिफारस पत्र , मनपा सहाय्यक उपायुक्त यांचे प्रमाणपत्र घेतल्या नंतरच आँनलाईन नोंदणी केली जाते. मनपा सहाय्यक उपायुक्त यांचे प्रमाणपत्र देताना कागदपत्रांची पूर्तता करण्याअगोदर बांधकाम गुत्तेदार यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. सिडको मनपा कार्यालया अंतर्गत नोंदणी करण्यासाठी काही गुत्तेदारांनी मनपा सिडको कार्यालय परीसरात दलालांची नेमणूक केली आहे. एखाद्या कामगाराने बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी मनपा सिडको कार्यालय येथे प्रवेश करताच दलाल मंडळी पाठलाग करताना दिसतात. जर मनपा परीसरात असलेल्या बांधकाम गुत्तेदार यांची शिफारस पत्र न घेता ईतर गुत्तेदार यांची शिफारस पत्र असेल तर मनपा अधिकारी यांची स्वाक्षरी मिळण्यास विलंब होतो. यावरुन या सर्व कामी मोठी आर्थिक साखळी असल्याचे बोलले जाते आहे. कोरोना महामारीचा मुकाबला करताना हाताला काम नाही त्यातच शासनाची एखादी योजना कामगारांना मिळेल ही आशा असतानाच ही दलाल मंडळी मोठा त्रास देत आहेत. अश्या मंडळी वर कायदेशीर कारवाई केली जावी अशी एका निवेदनाद्वारे शशीकांत गाडे पाटील यांनी सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालय यांच्या कडे केली आहे.











































