Home महत्वाची बातमी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

139

 

रावेर (शरीफ शेख)
रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या अधिष्ठाता आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या वर कारवाई करावी.या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार यांना दिले.

तहसिलदर उषाराणी देवगुणे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की,सुप्रीम कोर्टाने दि.०८/१०/२०२० रोजी डॉ. पायल तडवी आत्महत्या केसमधिल आरोपींना नायर मेडिकल कॉलेज मधे पुढील शिक्षणासाठी अनुमती देणारा निकाल दिला वैद्यकीय शिक्षणानंतर डॉक्टर पायल तडवी आदिवासी भिल तडवी समाजातील पहिली महिला डॉक्टर होणार होती. पण नायर हॉस्पिटल मधील आरोपी डॉक्टर्सनी वारंवार मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले. डॉक्टर पायल तडवी च्या आत्महत्या संदर्भात संबंधित आरोपी महिला डॉक्टर्सना दोषी मानून खटल्यातील साक्षीदार व पुराव्यात छेडछाडीची शक्यता लक्षात घेऊन हायकोर्टाने नायर मेडिकल कॉलेज मधे पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्रतिबंध करणारा निकाल दिला होता पण आरोपी डॉक्टर या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेल्या.

सर्वोच्च न्यायालयाने डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात जो निकाल दिला आहे तो पहाता पायलला न्याय मिळवून देण्याच्या कामी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे.

प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या एका ध्येयवेड्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोपींच्या दुष्प्रवृत्ती ना बळ देण्यासारखा आहे.

भारतीय संविधानाने सर्वांना शिक्षणाची समान संधी दिली आहे यामुळे दुर्बल घटक दलित आदिवासी समाज, बहुजन समाज अशा सर्वच वर्गातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन सर्वांगीण प्रगती करत आहेत. परंतु आजसुद्धा सर्वच मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन प्रगती करू नये ही जातीवादी विषारी मानसिकता या विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण आणि उज्वल भविष्यातील सर्वात मोठा अडसर ठरत आहे याचे ज्वलंत आणि विदारक उदाहरण म्हणजे सहकारी डॉक्टरांच्या छळाला कंटाळून डॉक्टर पायल तडवी ने केलेली आत्महत्या होय. ही दुष्प्रवृत्ती शिक्षणात अडथळा तर ठरतेच पण उज्वल भविष्य आणि आनंदी जीवन सुध्दा संपवते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीची सर्वांगीण प्रगती होते. आपल्या समाजाच्या सेवेचा -उन्नतीचा विचार करणारी डॉक्टर पायल तडवी सामाजिक बांधिलकी असलेली गुणवंत आणि गुणवत्तापूर्ण डॉक्टर होती. डॉक्टर पायल तडवी या उच्चशिक्षित तरुणीला जीवन संपवायला भाग पाडणे ही दुर्बल समाज आणि समाज घटकां मधे असुरक्षिततेची भावना निर्माण करणारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक दृष्ट्या दुर्बल जीवन जगायला भाग पाडणे आणि त्यांचे खच्चीकरण करणे होय. एका उच्चशिक्षित तरुणीला आत्महत्या करायला भाग पाडणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या शारीरिक बळाचा, शस्त्राचा वापर न करता तिची केलेली हत्या होय.

डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपी डॉक्टर अशाच विघातक शक्ती आहेत त्यांच्या गंभीर अपराधाबद्दल त्यांना निर्दोष मुक्तता मिळण्यापूर्वी पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याची संधी देणे म्हणजे अशा विघातक प्रवृत्ती ना बळ देणे आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला उच्च शिक्षणाची संधी नाकारणे होय .आपल्या देशात सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणापासून अजूनही वंचित आहेत अशा दुर्दैवी घटना दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवून दुर्बल व मागास घटकातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारे आहे.

वैद्यकीय क्षेत्रात भेदभावाला थारा असू नये .वैद्यकीय क्षेत्र निस्सीम सेवाभाव, परोपकार आणि निरामय सेवेचे क्षेत्र आहे कुशाग्र बुद्धी, निरोगी शरीर आणि करुणा शील मनाच्या डॉक्टरची देश आणि समाजाला आवश्यकता आहे. डॉक्टर जीवन संपवत नाहीत तर जीवन दीर्घायुषी, समृद्ध ,संपन्न बनवतात. एखाद्या व्यक्तीला जीवन संपवायला भाग पाडणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय क्षेत्रात सेवा देण्याची पात्रता संशयास्पद आहे.

मानवी हक्क आणि अधिकार यांचा विचार करता डॉक्टर पायल तडवी ला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी खालील मागण्या करीत आहे-

1) महाराष्ट्र सरकारने या केसमध्ये डॉक्टर पायल तडवी ला न्याय मिळवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

2) महाराष्ट्र रागिंग प्रतिबंधक कायद्यानुसार डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्याची रांगिंग विरोधी समितीची शिफारस असतानाही महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कायद्याच्या चौकटीत बसणारे आदेश काढले नाहीत त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे आरोपींनी रांगिंग केल्याचे सिद्ध झालेले असूनही प्रतिबंधक कायदा लागू होत नाही सबब अधिष्ठाता आणि कुलगुरू या दोघांवरही कारवाई करण्यात यावी.

3) डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींचे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने वैद्यकीय व्यवसायाचे लायसन्स रद्द करावे.

4) उच्च शिक्षण घेत असताना जातीयवादी मानसिकतेतून दलित आदिवासी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा जो छळ केला जातो त्यावर प्रतिबंध आणणारा कायदा असावा.

5) डॉक्टर पायल तडवी ला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ आणि निष्णात वकिलांची नियुक्ती करून विशेष प्रयत्न करावेत.

 

उच्च शिक्षण घेणाऱ्या दलित-आदिवासी, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तींना कोणत्याही सवलती न देता कठोर आणि न्याय निष्ठ भूमिका घेऊन डॉक्टर पायल तडवी ला मृत्यूनंतर न्याय मिळावा या रास्त भूमिकेसाठी वंचित बहुजन आघाडी उपरोक्त मागण्या करत आहे.

‍निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जि.अध्यक्ष विनोद सोनवणे, जि.महा सचिव दिनेश इखारे, जि.उपाध्यक्ष रफ़िक़ बेग, रावेर ता.अध्यक्ष बाळू शिरतुरे,सुरेश अटकाळे सलीम शाह,अर्जुन वाघ, रमेश सोनवणे, देवराम कोचुरे,गौतम अटकाळे याच्यासह कार्यकर्ते व पदाधीकारी यांच्या सहया आहे.