Home सातारा मायणी परिसरात नाविन्यपूर्ण फुलपाखरुंची उपस्थिती , “राज्य फुलपाखरू ‘नीलवंत’ सह सुंदर...

मायणी परिसरात नाविन्यपूर्ण फुलपाखरुंची उपस्थिती , “राज्य फुलपाखरू ‘नीलवंत’ सह सुंदर बटरफ्लाय ची गर्दी”

117
0

सतीश डोंगरे

मायणी , दि .३- ता.खटाव. जि.सातारा – सभोवतालच्या कोरोना वातावरणात मायणी नगरीत ‘वन्यजीव सप्ताहात’ एक सुखद आनंद देणारी बाब आढळून आली महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ नीलवंत’ याने मायणी येथे आपली उपस्थिती दाखवली असून कॉमन बॅरन  फुलपाखरासह निरनिराळ्या बटरफ्लायची उपस्थिती मायणीच्या शिरपेचात निसर्गाचा अनोखा तुरा खोवत आहेत.

           मायणीत गेले दोन दिवस ‘ नीलवंत ‘(ब्ल्यू मॉर्मन ) फुलपाखरु सुरज किशोर बाबर यांच्या स्टील दुकानात ठाण मांडून बसले होते. बाबर यांनी त्यांनी त्याला हटकले नाही परंतु त्यांनी सोशल मीडियावरील आलेली फुलपाखरू ची माहिती पाहून दुकानातील फुलपाखरू निरखुन पाहिले असता हे राज्य फुलपाखरू ‘निलवंत’असल्याचे समजले. तर चांदणी चौक येथे शादाब राजू बागवान या युवक फळविक्रेत्याच्या दुकानातील डाळिंबावर कॉमन बॅरन हे फुलपाखरू आपल्या सोंडेने रस ग्रहनाचे काम करताना आढळले . या नवनवीन फुलपाखरांचे  वावरणे लोकांच्यातील उत्सुकता वाढवत आहे.

           यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मायणी ब्रिटिशकालीन तलाव व पक्षी आश्रयस्थान याठिकाणी पक्षांच्या आकर्षण तर वाढलेलंच आहे सध्या याबरोबरच नवनवीन प्रसिद्ध फुलपाखरांची परिसरातील उपस्थिती पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

 

 

           https://youtu.be/Dueo7qN71zI

 

 

     ब्ल्यू मॉर्मन : (नीलवंत). या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतातील वनांत आणि श्रीलंका या ठिकाणी आढळते. पश्‍चिम घाटातील वनात त्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्येही ते आढळते. त्याचा पंखविस्तार १५० मिमी. असतो. शरीर आणि पंख काळे असून दोन्ही पंखांवर निळे ठिपके असतात. मागच्या पंखांच्या खालील बाजूस शरीराकडील टोकावर लाल ठिपका (बुंदका) असतो. काळ्या पंखावरची निळी तकाकी दिसून येते. हे फुलपाखरू वेगाने फुलांवर संचार करीत असते व फुलातील मकरंद आणि चिखलातील क्षार शोषून घेते. संत्री, र्इडलिंबू व मोसंबी या वनस्पतींवर मादी अंडी घालते. २२ जून २०१५ मध्ये या फुलपाखराला ‘महाराष्ट्र राज्य फुलपाखरू’ असा दर्जा देण्यात आला आहे.

   कॉमन बॅरन….!

(पंख विस्तार – ५५ ते ८० मिमी.)

(Euthalia aconthea Cramer)

 नर कॉमन बॅरन गडद तपकिरी रंगाचा असून ह्याच्या पुढील पंखावर बारीक ठिपक्यांची ओळ असते. मादी मात्र फिक्कट तपकिरी असून तिच्या पुढील पंखावर ठळक पांढरा पट्टा असतो. दोघांच्या मागील पंखावर काळे ठिपके असतात. ह्याचे शरीर मजबूत असते. हे वेगाने आणि जोमाने उडते. हे नेहमी पंख उघडे ठेवून बसते. माळराने वगळता हे सर्व प्रकारच्या अधिवासात तसेच शहरी भागात आढळते. ह्याला कुजकी फळे, पक्षी विष्ठा आणि ओलसर जागा विशेष प्रिय आहेत. हे फुलांवर कधीही येत नाही. कॉमन बॅरन संपूर्ण भारतात आढळते.

   

   चौकट – 

              अतिशय आकर्षक आणि अनोखे दिसणारे हे निलवंत फुलपाखरू दुकानात दोन दिवस येऊन बसले होते. आम्हीही त्याला हटकले नाही परंतु मोबाईल वर आलेल्या माहितीने आम्हाला हे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन असल्याचे समजले.आम्हाला आनंद झाला. पक्षी आश्रयस्थाना सोबत परिसरातील फुलपाखरू व इतर नवीन जीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजेत – किशोर बाबर .

चौकट – 

           हा काळ फुलपाखरांसाठी पोषक असतो, या काळात अनेक फुलपाखरांच्या जाती कोषातून बाहेर पडून आकाशी झेप घेत असतात. सध्या अनेक पक्षी प्राणी संघटना या नवीन प्रजातींचा शोध घेत असतात यावर संशोधन करीत असतात. यासाठी स्थानिक पातळीवर या जीवांचे संगोपन होणे गरजेचे असून या जीवांची  त्या-त्या भागातील उपस्थितीची नोंद होणे गरजेचे आहे.

           – सर्वदमन कुलकर्णी ,अँनिमल सहारा फाउंडेशन,सांगली.