
यवतमाळ – राज्यातील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने राज्य युवा क्रीडा शिक्षकांची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. या कार्यकारिणीत यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील आर. एम. इंटरनॅशनल स्कूलचे शारीरिक शिक्षक विकास विनोद शेळके यांची निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर येथे नुकतीच राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे वार्षिक सभा घेण्यात आली महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी युवा राज्य कार्यकारिणी जाहीर केली. राज्य उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव राजेंद्र कदम, सहसचिव राजेश जाधव, विलास घोगरे, सुनिता नाईक, प्रितम टेकाळे यांचेसह राज्यातील सर्व क्रीडा समन्वयक, पदाधिकारी उपस्थित होते.
विकास शेळके हे उत्कृष्ट शारीरिक शिक्षक, संघटक व प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. ते स्लिंगशॉट स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ विदर्भाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तर जिल्हा मोंटॅक्सबॉल क्रिकेट असोसिएशन,किकबॉक्सिंग व युनिफाईड या खेळ संघटनेचे सचिव आहेत. गत सात वर्षापासून ते वुशु खेळाचे राज्य तर मोंटॅक्सबॉल चे राष्ट्रीय पंच म्हणून काम पाहत आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. अशा उमद्या युवा क्रीडा शिक्षकांची राज्य युवा क्रीडा कार्यकारिणीत निवड झाल्याने जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची प्रश्न मार्गी लागतील.असा विस्वास शारीरिक शिक्षकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.










































