Home मराठवाडा जालना भाजपात गटबाजी चव्हाट्यावर

जालना भाजपात गटबाजी चव्हाट्यावर

1237

केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हुकुमशाही धोरणामुळे पक्षाचे अतोनात नुकसान

 

माजी मंत्री बबनराव लोणीकर समर्थकांच्या आरोप

 

लक्ष्मण बिलोरे

जालना – दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टी मध्ये केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांची हुकूमशाही प्रवृत्ती वाढत चालली असून त्यांच्या हुकूमशाही आणि एकाधिकारशाहीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या अतोनात नुकसान होत आहे, असा आरोप माजी मंत्री बबनराव लोणीकर समर्थकांच्या गोटातून उफाळून आल्याने पुन्हा एकदा जालना भारतीय जनता पार्टी मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर डावलले जात असेल आणि आपल्या मर्जीतील आणि हुजरेगिरी करणार्‍या कार्यकर्त्यांना आणि आपल्याच कुटुंबातील लोकांना पार्टीमध्ये सक्षम आणि महत्वपूर्ण पदे द्यायची असतील तर सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायचा का ? असा सवाल भारतीय जनता पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजुळ तसेच रोहयो तालुका अध्यक्ष अंकुशराव बोबडे यांनी उपस्थित केला आहे.

रावसाहेब दानवे यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे जालना जिल्हा परिषद दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली नाही. स्वतः केंद्रीय मंत्री, मुलगा जिल्हाध्यक्ष ,आमदार ,…भाऊ पार्टी जिल्हा उपाध्यक्ष ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ,नगरपालिकेचा माजी सभापती व विद्यमान नगरसेवक मग बाकी सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचे… किमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी तर राहावं की पार्टी सोडून द्यावी हे तरी एकदा स्पष्ट करावं असा उद्विग्न सवाल शेजुळ आणि बोबडे यांनी उपस्थित केला आहे.