Home नांदेड गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून आपली शांततेची परंपरा कायम ठेवावी -‌आमदार भीमराव केराम

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून आपली शांततेची परंपरा कायम ठेवावी -‌आमदार भीमराव केराम

146

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. १३ : – सर्व जाती धर्माची लोकं एकत्रं येऊन शांततेत सण, उत्सव साजरे करण्याची आपल्या किनवट माहूर मतदार संघाची ऐतिहासिक परंपरा आपण यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून कायम ठेवावी , असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
पोलिस व महसूल विभागाच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या शातंता समिती बैठकीचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना आ. केराम म्हणाले की, कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायलयाने निर्गमित केलेला आदेश आणि स्थानिक प्रशासनाचे धोरण यांचेशी सुसंगत मंडप उभारावेत , सजावटीत भपकेबाजी नसावी , श्रीगणेशाच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत, स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने विसर्जनाच्या मूर्ती संकलीत करण्याची आखणी नगरपालिकेने करावी. आपल्या श्रध्देचा आदब राखून घरच्या घरी उत्सव साजरा करून गर्दीत जाणे टाळून स्वतः व कुटूंबियांचे कोरोना साथीच्या रोगापासून रक्षण करावे. तसेच शहरी भागात होणाऱ्या शांतता समितीच्या बैठकी सारख्या प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेण्यासाठी महसूल व पंचायत समितीने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले .
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी गणेशोत्सवा संदर्भात शासन परिपत्रकाच्या मार्गदर्शक सूचना सांगितल्या. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी प्रास्ताविक केले. तहसिलदार उत्तम कागणे यांनी आभार मानले.
याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, दिनकर चाडावार, साजीद खान , माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, अनिल तिरमनवार, नगरसेवक जहीरोद्दीन खान, सामाजिक कार्यकर्ते मारोती सुंकलवाड, विजय वाघमारे, बोडके,नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम घुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार आदींसह मूर्तीकार,विविध पक्षांचे, गणेश मंडळाचे व पत्रकार संघाचे पदाधिकारी शारीरिक अंतर ठेऊन उपस्थित होते.