Home विदर्भ जिल्हाधिकारी यांची बालगृह व शिशुगृहांना भेट

जिल्हाधिकारी यांची बालगृह व शिशुगृहांना भेट

122

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०४ :- जिल्हाधिकारी विवेक भीमनवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जिल्ह्यातील शासकीय निरीक्षण गृह , बालगृह तसेच शिशुगृहांना भेट देऊन बालगृह व शिगृहात बालकांची काळजी कशी घेतली जाते याची माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.
श्री. भीमनवार यांनी शासकीय मुलांचे वरिष्ठ बालगृह आणि तक्षशिला शिशुगृह ,आकांक्षा शिशुगृह सेवाग्राम येथे भेट देऊन बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत बालकांच्या प्रवेश प्रक्रिया, कोणत्या स्वरूपाची मुलं व कोणत्या परिस्थितीतून बालगृह येथे दाखल होतात, मुलांची काळजी कशाप्रकारे घेतली जाते तसेच दत्तक विधान प्रक्रिया समजून घेतली. मुलं संस्थेत दाखल होण्यामागची मूळ कारणे कोणती आहेत या बाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी महिला व बाल विकासच्या संपूर्ण योजनाविषयीची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली.
मुलांची राहण्याची व आरोग्याविषयी सखोल चौकशी केली व बालगृहकरीता कोणत्या स्वरूपाच्या वस्तूंची व बाबींची गरज आहे या विषयी जाणून घेतले व त्याची पूर्तता करण्याची ग्वाही दिली. तसेच महिला व बाल विकास विभागाची सर्व बालगृह व शिशू गृह एकाच छताखाली असावी व त्याकरिता जागेचा प्रस्ताव सादर करावा अश्या सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे कामकाज, बालकल्याण समिती, बालन्याय मंडळाचे कामकाज या विषयी सविस्तर चर्चा केली व योग्य कामकाज करावे. बालकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता त्यांना योग्य वातावरण मिळावे, संस्थेत स्वच्छता राखावी असेही त्यांनी सांगितले.आरोग्य व शिक्षण या विषयी प्रत्यक्ष मुलांशी संवाद साधला. बालगृह मधून बाहेर गेलेली व गेल्या 5 वर्षा मध्ये 18 वर्षे वरील सर्व मुलं आता काय करीत आहेत त्या विषयी ची माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. व बालकांचे योग्य रीतीने समुपदेशन करून त्यांना जिवन कौशल्य विकास प्रक्रियेत आणावे जेणेकरून त्यांचे पुढील आयुष्य ते चांगल्या पद्धतीने जगू शकतील यासाठी महिला व बाल विकास विभागाने प्रयत्न करावे असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी भेटी दरम्यान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, निरीक्षण गृह / बालगृहाचे अधीक्षक छोटू डी.बोरीकर, सदस्य बाल न्याय मंडळ प्रदीप गौतम, स्मिता बधीये, तक्षशिला शिशुगृहाचे अध्यक्ष बाबाराव गावंडे, डॉ. छाब्रा, अमोल राठोड व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.