Home विदर्भ अमरावती जिल्ह्यातील रेडझोन व नॉनरेड झोनसाठी सुधारित मार्गदर्शन सूचना जारी – जिल्हाधिकारी...

अमरावती जिल्ह्यातील रेडझोन व नॉनरेड झोनसाठी सुधारित मार्गदर्शन सूचना जारी – जिल्हाधिकारी शैलेश नवाल

141

मनिष गुडधे

अमरावती , दि. २६ :- जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये सुधारित आदेश जारी करण्यात आले आहे. आदेशानुसार राज्याची रेड झोन व नॉन रेड झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून दोन्ही क्षेत्रासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अमरावती महानगरपालिका क्षेत्र रेड झोन तर अमरावती ग्रामीण क्षेत्र हे नॉन रेड झोनमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज जारी केला. त्यानुसार क्लस्टर व कंटेनमेंट झोनसाठीचे सर्व आदेश लागू राहतील. तसेच जिल्ह्यातील रेड झोन व नॉन रेड झोनसाठी आदेशानुसार सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कंटनमेंट झोन मधील निवासी नागरिकांना आरोग्यसेतू ॲपद्वारे व विविध उपायांद्वारे 100 टक्के संरक्षण मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याधिका-यांना देण्यात आले आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत प्रतिबंधित सेवा :

सदर आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आल्या असून ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण प्रणालींना परवानगी देण्यात आली आहे. या पध्दतीला अधिक वाव देण्याचे सूचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरेंट ही बंद राहणार असून फक्त त्यांना खाद्यगृह सुरु ठेवून घरपोच पार्सलची परवानगी आहे. सर्व प्रकारची सिनेमागृहे, शॉपींग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, मद्यगृहे, मंगल कार्यालये व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन तसेच सर्व प्रकारची धार्मिक स्थळे, धार्मिक पुजा स्थळे सर्व नागरिकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक बाबी व वर्तन :

सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक स्थळी थुंकन्यास मनाई असून आढळून आल्यास दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. सोशल डिस्टंन्सिंग पाळणे, दारु, पान, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा सार्वजनिक स्थळी वापर व विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. दुकांनामध्ये संबंधित दुकानदारांनी ग्राहकांमध्ये सहा फुटाचे सुरक्षित अंतर राखावे व पाचपेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनींग, हॅन्ड वॉश, सॅनीटायझर इत्यादी निर्जंतुकीकरण साधनांचा वापर आवश्यक करण्यात आले आहे. सर्व कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संचारबंदीच्या वेळा व खबरदारी :

संचारबंदीचे अगोदरचे आदेश पूर्ववत लागू असून कुठल्याही व्यक्ती, नागरिकांना हालचाल करण्याकरिता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सक्त मनाई केली आहे. 65 वर्षे व त्याहून अधिक वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती, 10 वर्षाखालील मुले यांनी आवश्यक किंवा आरोग्यविषयक कारणांशिवाय बाहेर पडू नये.
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रकारची कटिंग, सलून, स्पा आदी दुकाने बंद राहतील.
कंटेनमेंट झोनकरिता मार्गदर्शक सूचना :
रेड झोन व नॉन रेड झोन या दोन्ही क्षेत्रामधील

ज्याठिकाणी कोविड 19 या साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे, अशा क्षेत्रात किंवा क्लस्टर क्षेत्रात आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार मनपा आयुक्त, मुख्याधिकारी तसेच सक्षम प्राधिकारी यांनी सिमांकन करुन प्रवेशास प्रतिबंध करावा. अशा कंटनमेंट झोन मध्ये मार्गदर्शक सूचनानुसार संचारबंदीच्या कालावधीत अतयावयक व मुलभूत सेवा यांना देण्यात आलेली सुट लागू राहणार नसून परवानगी देण्यात आलेल्या बाबींना सुध्दा प्रतिबंध राहील. कंटेनमेंट झोनमध्ये कडक नियंत्रण राहणार असून आपतकालीन किंवा अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करतांना किंवा बाहेर जातांना तपासणी केल्याशिवाय सोडू नये. झोनमधील प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन ते वापरण्याचे सक्त निर्देश आहे. अशा झोन मध्ये विना परवाना ऑटो रिक्षांना प्रवेशास बंदी राहील. वरीलप्रमाणे सूचनांचे पालन करण्याचे फलक झोनच्या प्रवेशाच्या व बाहेर निघण्याच्या दोन्ही ठिकाणी दर्शनी भागात लावावे.
रेड झोन मध्ये या उपक्रमांना परवानगी :
रेड झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंच्या सेवा आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु राहतील. बिगर जिवनावश्यक दुकाने/ आस्थापनांना अगोदरच्या संचारबंदीचे आदेश लागू राहणार असून त्यांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी राहील. ई कॉमर्स क्षेत्राकरीता सर्व प्रकारच्या अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवा राहतील. रेड झोनमध्ये परवानगी नसलेली सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, आस्थापना, औद्योगिक प्रतिष्ठाने देखभाल, देखरेख व दुरुस्तीसाठी सुरु ठेवता येतील, परंतू, इतर कोणताही वाणिज्यिक वापर किंवा निर्मिती करता येणार नाही. त्यासाठी मनपा आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक राहील. महानगरपालिका क्षेत्रातील ज्या उद्योगांना यापूर्वी परवानगी देण्यात आली होती, ते सर्व उद्योग सुरु राहतील. मनपा क्षेत्रातील परवानगी प्रदान करण्यात आलेल्या सर्व प्रकारची बांधकामे सुरु राहतील.
रूग्णालये व औषधालये पूर्णवेळ सुरू राहतील. सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच महत्वाच्या कामासाठी विद्यापीठ आवश्यकतेनुसार सुरु राहणार असून त्याठिकाणी दहा टक्केपेक्षा शासकीय, खासगी, सार्वजनिक क्षेत्र कार्यालयात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी यांना आरोग्य सेतू हे ॲप वापरणे बंधनकारक राहील. वरीलप्रमाणे रेड झोनसाठी दिलेले निर्देश हे कंटनमेंट झोनलाही लागू राहतील.

नॉन रेड झोन मध्ये या उपक्रमांना परवानगी :

नॉन रेड झोन क्षेत्रामध्ये स्पोर्ट कॉम्पलेक्स, खेळाचे मैदान व इतर सार्वजनिक ठिकाणे व्यक्तिगत व्यायामाकरीता खुले राहतील. तथापि, प्रेक्षकांना व नागरिकांना एकत्र येण्यास व सांघीक खेळ खेळण्यास मनाई राहील. सर्व प्रकारच्या शारीरिक व इतर कसरती करतांना सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालकाव्यतीरिक्त इतर दोन प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकीगाडी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतीरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर केवळ चालक यांना परवानगी राहील दुसरा प्रवासी अनुज्ञेय राहणार नाही. आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवाशीसह सोशल डिस्टसिंग व निर्जंतुकीकरण करुन वाहतूकीकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. याकरीता विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती यांनी नियोजन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. अनुज्ञेय दुकाने/आस्थापना हे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत नियमित सुरु राहतील. अशा वेळी दुकांनामध्ये अथवा एका ठिकाणी जास्त गर्दी होत असल्याचे दिसून आल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी (नगर परिषद/पंचायत क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी/ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये सचिव, ग्रा.पं.) यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन सदरची दुकाने, बाजारपेठ बंद करतील. वरीलप्रमाणे नॉन रेड झोन करीता देण्यात आलेले निर्देश हे कंटेनमेंट झोन करीता लागू राहणार नाहीत.

या सेवासुविधा नियमित सुरु :

राज्यातंर्गत व राज्यबाहेरील सर्व प्रकारची वैद्यकीय व्यावसायीक, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, सफाई कर्मचारी, रुग्णवाहीका यांच्याबाबतची हालचाल कुठल्याही निबंर्धाशिवाय सुरु राहतील. राज्यातंर्गत असलेली सर्व प्रकारच्या मालवाहतूक (खाली ट्रक) सह सुरु राहील. आंतरराज्य, आंतरजिल्हा अंतर्गत असलेली कुठल्याही प्रकारची मालवाहतूक कुठल्याही प्राधिकारी यांनी प्रतिबंधीत करु नये, असे आदेशात नमूद आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता- 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे. उपरोक्त आदेश दि. 31 मे पर्यंत कायम राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी शैलेश नवाल यांनी एका आदेशाव्दारे कळविले आहे.