Home मुंबई महाराष्ट्रातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’करिअर निवडीसाठी उपयुक्त...

महाराष्ट्रातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’करिअर निवडीसाठी उपयुक्त या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आवाहन

142

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई , दि.२४ :- करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून १० हजार व्यक्तींनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी केले. राज्यातील 9 वी ते 12 वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टल चा फायदा होईल. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर मिळेल, असे दिनकर पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो, संधी व गरज विचारत घेऊन हे पोर्टल तयार केले असल्याचे युनिसेफ इंडियाचे शिक्षण विभाग प्रमुख टेरी डुरीयन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पोर्टल तयार केल्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंचालक समन्वय विकास गरड, यांनी केली. हे करिअर पोर्टल www.mahacareerportal.com वर उपलब्ध आहे.