Home विदर्भ माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू

माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू

323

नागरिकांनी ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा…

अर्जावर ई-मेल, भ्रमणध्वनी नमूद करण्याचे अमरावतीचे राज्य माहिती आयोग खंडपीठाचे माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांचे आवाहन

बालाजी सिलमवार

राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या अमरावती खंडपिठाचे कामकाज मर्यादीत उपस्थितीसह सुरू करण्यात आलेले आहे. तरीही वाहतूक व्यवस्था बंद असल्याने व्यक्तिश: सुनावणी प्रभावित झाली आहे. आयोगाकडील अपिल आणि तक्रारींवर जलदगतीने सुनावणी होण्यासाठी नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वत:च्या ई-मेलद्वारे आयोगाच्या ई-मेलवर सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह 20 रूपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी व्यवस्था केली आहे. तसेच आयोगाकडे पत्रव्यवहार करताना भ्रमणध्वनी क्रंमाक आणि ई-मेल पत्ता नमूद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात आयोगाने कळविले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार सध्या कार्यालय मर्यादीत उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. एरवी दर महिन्याला या कार्यालयात सुमारे 350 द्वितीय अपिल अर्ज आणि माहिती अधिनियम कलम 18 नुसार महितीसंबंधी तक्रारी दाखल होतात. निर्बंधामुळे संख्या कमी झाली आहे. कार्यालय मर्यादित उपस्थितीसह सुरू करण्यात आले असले तरी दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे आणि ती वापरास निर्बंध असल्यामुळे नागरिकांना व्यक्तीशः माहिती आयोगाचे कार्यालयात येणे शक्य होत नाही.

गेल्या तीन वर्षांपासून आयोगाकडे दाखल झालेल्या आठ हजार द्वितीय अपिल आणि एक हजार तक्रारींवर सुनावणी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी अमरावती खंडपिठाच्या कामात काही अंशी बदल करण्यात आले आहेत. अपिलकर्त्यांना कार्यालयात व्यक्तिश: येणे शक्य नसले तरीही आयोगाने कामकाज सुरू केले आहे. गरजेनुरूप अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून व्हाट्स ॲप कॉल आणि श्राव्य सुनावणीचा भाग म्हणून साधा कॉल करून अपिलकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येत आहे. तक्रारी आणि अपिलावर कार्यवाही करतांना अप्रत्यक्ष सूनावणी घेण्यात येणार आहे. अपिलार्थी आणि तक्रारदार यांच्या अर्जावर संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्या कार्यालयीन ई-मेल पत्यावर विस्तृत नोटीस पाठविण्यात येत आहे. तसेच सविस्तर खुलासे मागविण्यात येत आहेत.

अपिलार्थी आणि तक्रारदार यांना सुनावणीच्या दृष्टीने संपर्क करण्यासाठी अर्जावर त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना संपर्क करण्यात मोठी अडचण झाली आहे. तसेच सार्वजनिक प्राधिकरणावर बजावण्यात येत असलेल्या नोटिसमधून अपिलार्थी आणि तक्रारदार यांचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी प्राप्त करून आयोगास पुरविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक प्राधिकरण आणि नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वतःच्या ई-मेलद्वारे आयोगाचा ई-मेल आयडी dsmsicamwt@gmail.com वर सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह 20 रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी लावण्याची व्यवस्था केली आहे. आयोगाकडे असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी आवश्यक नमूद करावा, असे आवाहन राज्य माहिती आयोग खंडपीठ अमरावतीचे माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे साहेब यांनी केले आहे.