Home मराठवाडा कोरोनाचे जाळे ग्रामीण भागांतही पसरू लागले… नागरिकांमध्ये घबराट

कोरोनाचे जाळे ग्रामीण भागांतही पसरू लागले… नागरिकांमध्ये घबराट

98

लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी

जालना – जालना जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या औरंगाबाद, बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा प्रभाव वाढला आहे.त्यामुळे जालना जिल्ह्यातील जनतेत चिंता वाढली असून कोरोनाचे लोन जिल्ह्यातील ग्रामीण भागात पसरू लागल्याने लोक घाबरू लागले आहेत. जिल्ह्यात आज रविवारी ता.१७ रोजी दहा नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडल्यामुळे जालना जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता ३५ वर येऊन ठेपली आहे.

या १० रूग्णांमध्ये जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असून घनसावंगी तालुक्यातील पिरगेबवाडी येथील ६,रांजनी येथील १आणि अंबड तालुक्यातील कानडगाव येथील १ अशा १० जणांची भर पडल्याने शहरासह ग्रामीण भाग कोरोनाच्या भितीने बिथरला आहे.ग्रामीण जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. आज दिवसभरात ग्रामीण भागातही सन्नाटा पसरल्याचे दिसून आले. कोरोनाच्या रूपाने मृत्यू अंगणात आल्याचे चित्र असतानाही बाजारपेठेच्या गावांतून लोक पोलिसांनाही गुगली देत बेफिकीर पणे मास्क,सॅनिटायझरचा वापर न करता फिरताना आढळून येत आहेत, बाजार पेठेतल्या कापड,स्टेशनरी, भांड्यांच्या दुकाना, ज्वेलरी, संसारोपयोगी साहित्याच्या दुकाना मागच्या दाराने ‘दुकानदारी’ जोरात सुरू ठेवत असल्याने ,कोरोनाचा प्रसार कसा रोखता येईल ? असा प्रश्न पोलिस आणि आरोग्य विभागा समोर निर्माण झाला आहे.घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मोठी बाजारपेठ आहे.’ रस्ता बंद ,काम चालू ‘ अशी बाजार पेठेतील अवस्था बनल्याने लोकांची गर्दी काही आटोक्यात यायला तयार नाही. ग्रामपंचायत आणि व्यापारी महासंघामध्ये बंद बाबतीत समन्वय साधला जात नसल्याने धोक्याची घंटा वाजू लागली आहे.कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी परवा ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.परंतु त्यानंतरही बाजारपेठ ‘ चोरी चोरी,छुपके छुपके ‘ सुरू असल्याचे आढळून आले.