Home राष्ट्रीय भारताने घाई करु नये, किमान १० आठवड्यांचा लॉकडाउन जाहीर करावा – रिचर्ड...

भारताने घाई करु नये, किमान १० आठवड्यांचा लॉकडाउन जाहीर करावा – रिचर्ड हॉर्टन (मेडिकल जर्नल लँसेटचे संपादक )

88
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

करोनाचा – फैलाव रोखण्यात यश न मिळाल्याने भारताने १४ एप्रिल रोजी संपणारा लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवलेला आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पाही संपण्याच्या जवळ आला आहे. अनेकांना ३ मे नंतर आयुष्य पुन्हा एकदा सर्वसामान्य होईल अशी अपेक्षा आहे. मात्र जगातील सर्वात प्रतिष्ठित मेडिकल जर्नल लँसेटचे संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी भारताला लॉकडाउन संपवण्याची घाई करु नका असा सल्ला दिला आहे. भारताने किमान १० आठवड्यांचा लॉकडाउन पाळला पाहिजे असं रिचर्ड हॉर्टन यांनी म्हटलं आहे.

इंडिया टुडेशी बोलताना रिचर्ड यांनी म्हटलं आहे की, “करोना व्हायरस हा कायम राहणार नाही. एक दिवस त्याचा शेवट होईल. आपले देश करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलत आहेत. जर भारतात लॉकडाउन यशस्वी झाला तर १० आठवड्यांनी करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसेल. जर व्हायरस पूर्णपणे संपला तर गोष्टी पुन्हा एकदा सामान्य होतील. पण खरं सांगायचं तर अगदीच सामान्य होणार नाहीत. आपल्याला सामाजिक अंतर पाळावं लागणार आहे. कदाचित आपल्याला मास्कचा वापरही करावा लागेल. तसंच स्वच्छतेकडे सर्वात जास्त लक्ष द्यावं लागणार आहे”.

भारतात लॉकडाउनची मुदत संपत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “मला कल्पना आहे की तुम्हाला अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे. पण घाई करु नका. जर तुम्ही लॉकडाउन संपवण्यात घाई केली आणि जर व्हायरसची दुसरी लाट आली तर ती जास्त भयंकर असेल”.

“मग अशावेळी तुम्हाला पुन्हा एकदा लॉकडानच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी लागणार आहे. तुम्ही लॉकडाउनमध्ये इतके प्रयत्न आणि वेळ घालवला आहे. तो वाया जाऊ देऊ नका. लॉकडाउन शक्यतो १० आठवड्यांसाठी सुरु राहू द्या,” असं रिचर्ड यांनी सांगितलं आहे. रिचर्ड यांनी यावेळी चीनचं उदाहरण देत वुहानमध्ये १० आठवड्यांनी परिस्थिती नियंत्रणात कशी आली याबद्दल सांगितलं.

वुहानने २३ जानेवारीला १० आठवड्यांसाठी लॉकडाउन जाहीर केला होता. अशा पद्दतीने त्यांनी व्हायरसवर नियंत्रण मिळवलं. आता तेथील परिस्थिती सामान्य होत आहे. व्हायरसचं स्वरुप पाहता हेच योग्य मॉडेल आहेत. कारण जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग नाही पाळला तर वेगाने त्याचा फैलाव होतो,” असं रिचर्ड यांनी सांगितलं आहे.

१० आठवड्यांनंर करोनाचा फैलाव पूर्णपणे रोखला जाईल याची काय शाश्वती आहे असं विचारल असता त्यांनी सांगितलं की, “१० आठवड्यांनंतर फार कमी लोकांना लागण झालेली असेल. यामुळे त्याचा फैलाव नियंत्रणात असेल. लॉकडाउनमध्ये टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे”.