Home जळगाव पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा

पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा

77
0

ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल
यांची पत्राद्वारे मागणी….

जळगाव – संपूर्ण विश्व आज कोरोना व्हायरसजन्य रोगामुळे संक्रमणाच्या उंबरठ्यावर झुंज देत आहे. यामुळे लाखो लोकांचे बळी गेले आहेत. भारतातही आतापर्यंत जवळपास दहा हजाराच्यावर नागरिक कोरोनाने बाधित झाले आहेत. सर्वात जास्त झळ ही महाराष्ट्राला बसली असून, सरकार मोठ्या प्रमाणात त्यासाठी अहोरात्र उपाययोजना करीत आहे. या संकटसमयी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला तिसऱ्यांदा संबोधित करताना भारतातील बंदिवास म्हणजेच लॉकडाउन पुन्हा तीन मेपर्यंत वाढवला आहे आणि तो आवश्यकदेखील आहे. या पूर्ण लॉकडाऊनच्या कार्यकाळात आपल्या देशातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस बांधव, सरकारी कर्मचारी आणि मीडियाकर्मचारी हे ‘कोरोना योद्धा’सारखे कार्य करीत आहेत. मात्र, यामध्ये मीडिया कर्मचाऱ्यांना पाहिजे ते स्थान देण्यात येत नाही. घरबसल्या देशातील कोट्यवधी जनतेला खरी माहिती प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातूनच मिळत आहे. त्यामुळे ही माहिती देणाऱ्या आपल्या जिवाशी खेळून या खऱ्या बातम्या एकत्रित करून त्या लोकांपर्यंत पोहचविणाऱ्या देशातील असंख्य पत्रकारांना, मीडिया कर्मचाऱ्यांनादेखील ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांनी एका पत्राद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या पत्रात पालीवाल यांनी नमूद केले आहे की, सोशल मीडियातून जरी लोकांना देशात आणि जगात काय चालले आहे हे समजत असले तरी खऱ्या बातम्या वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून लोकांना मिळत आहेत. मात्र, या महत्त्वाच्या बातम्यांसाठी देशातील असंख्य पत्रकार, वार्ताहर, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, उपसंपादक, संपादक मंडळ, वरिष्ठ संपादक मंडळ आणि तंत्रज्ञ अपार कष्ट घेत आहेत. आपल्या कुटुंबीयांसोबत न राहता अशावेळी देशाच्या सेवेसाठी आणि देशवासीयांना योग्य अचूक माहिती देण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत, असेही या पत्रात पालिवाल यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामध्येही माध्यम कर्मचारी 24 तास कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मेहनतीला बळ मिळावे आणि त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी आणखी शक्ती मिळावी यासाठी या सर्वच पत्रकारांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी या पत्राद्वारे पालीवाल यांनी केली आहे.