Home मराठवाडा किनवट – सहायक जिल्हाधिकारी यांच्या कारवाईने किनवटमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क

किनवट – सहायक जिल्हाधिकारी यांच्या कारवाईने किनवटमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क

659

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. २६ :- कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत तालुक्यात सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दोन होमकोरोंनटाईन व दोन डॉक्टर्सवर केलेल्या सक्त कारवाईने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जनतेनेही आता स्वतःला ‘लॉक डाऊन ‘ करून घेतल्याची स्थिती पाहणी दौऱ्यात दिसून आल्याचे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची जय्यत तयारी केली आहे. परदेशातून वा अन्य शहरातून तालुक्यात आलेल्यांचा घर ते घर सर्वे करून प्रवासाची हिस्टरी जाणून काहींच्या हातावर होमकोरोंटाईन शिक्का मारून त्यांना स्वतःच्याच घरी होमकोरोंटाईनचा सल्ला दिला आहे. परंतु त्यातील काहीजन स्वतःची नाही तर नाहीच ;परंतु इतर कुणाचीही पर्वा न करता बिनधास्तपणे घराबाहेर फिरत होते. आप्तेष्ट व गावकऱ्यांनी वारंवार सांगुनही ते ऐकत नव्हते. तक्रार कक्षास याची माहिती मिळताच तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी नरेंद्र देशमुख यांनी तेलंगणा सिमेवरील तलाईगुडा येथे भेट देऊन त्याला १८८ कलमान्वये नोटीस बजावली आणि आपल्या घरीच राहण्याची तंबी दिली. अन्यथा पोलिसा मार्फत ताब्यात घेऊन तहसिल कार्यालयातील कोरोंटाईन वार्डमध्ये ठेवण्यात येईल असे बजावताच घरीच राहण्याची त्याने कबुली दिली.
या पाहणी दौऱ्यात तहसिलदार देशमुख यांचे समवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे व गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने होते . यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी ( सि), मांडवी, उमरी ( बा), देहली तांडा, राजगड, उपकेंद्र अंबाडी, घोटी, पिंपळगाव, सारखणी, उनकेश्वर नाका येथे भेटी देऊन पूर्वतयारीची पाहणी केली व मौलिक सूचना दिल्या.
सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गैरहजर असलेले डॉ. भंगे व डॉ. दस्तगीर यांचेवर कडक कारवाई केल्याने तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे धाबे दणाणले असून ते सतर्क झाले आहेत. आम्हालाही आता उचलून नेतील या धास्तीने शिक्का मारलेले होम कोरोटाईन झाले आहेत.