Home विदर्भ अमरावतीत २ कॉरोनटाईन रुग्णालये सज्ज…!

अमरावतीत २ कॉरोनटाईन रुग्णालये सज्ज…!

155

मनोरंजनासाठी टीव्ही, कॅरम व बुद्धिबळ

रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर आदी सुविधा मिळविण्याचे निर्देश

मनिष गुडधे

अमरावती, दि. २० :- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ‘108 रुग्णवाहिकां’सह इतरही रूग्णवाहिकांची दुरुस्ती इमर्जन्सी फंडातून तत्काळ करून घ्यावी, त्याचप्रमाणे, रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर व इतर आवश्यक साधने उपलब्ध करून घ्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज इर्विन रूग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन क्षेत्राची पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, 108 रुग्णवाहिका सेवेतील, तसेच ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील सर्व रुग्णवाहिकांचा आढावा व माहिती घेऊन नादुरुस्त वाहनांची तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी. ज्या रूग्णालयांत व्हेटिंलेटर आवश्यक आहेत, तिथे ती सुविधा तत्काळ मिळवावी. इमर्जन्सी फंडातून ही कार्यवाही पूर्ण करावी. रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्यासह बाहेरून येणा-या प्रवाश्यांची तपासणी, देखरेख ही प्रक्रिया काटेकोरपणे करावी.

पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डला भेट देऊन पाहणी केली. यावेळी परदेश किंवा बाहेरून आलेले काही नागरिक तपासणीसाठी आले होते. त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसत नसली तरीही त्यांनी घरात स्वतंत्रपणे राहून योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. तेथील डॉक्टर व पारिचारिका यांच्याशीही त्यांनी संवाद साधला व दक्षतेबाबत सूचना दिल्या.

वलगाव येथे उभारण्यात आलेल्या आयसोलेशन क्षेत्राचीही त्यांनी पाहणी केली. या क्षेत्रात 100 व्यक्ती राहू शकतील अशा सुविधा उपलब्ध आहेत. परिचर, सहायक आदी स्टाफही तिथे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास मोझरी येथेही अशी सुविधा उभारता येईल. जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवेंतर्गत 29 वाहने उपलब्ध आहेत. त्यातील नादुरुस्त वाहनांची तत्काळ दुरुस्ती, परदेशातून येणा-या नागरिकांची तपासणी व ट्रॅकिंग ठेवणे व सर्वांनी सजग राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शासनाकडून कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.