July 11, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

गुटखा माफियांवर राज्य सरकार कठोर कार्यवाही करणार – अजित पवार

अमीन शाह

कर्करोगासारख्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गुटखा व त्या अनुषंगिक उत्पादनांवर शासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे. तथापि, अजूनही अवैध मार्गाने विक्री होतांना आढळून येत आहे. अशा अवैध मार्गाने गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर शासन कठोर कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती येथील गिरिराज हॉस्पिटल आणि जैन सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान, शस्त्रक्रिया व किमोथेरपी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रमेश भोईटे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील तसेच विविध संस्थेचे मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीनुसार जगामध्ये कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा आजार असून या आजारामुळे मोठ्या संख्येने नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. हवामानबदल,आहारातील बदल तसेच ग्रामीण भागातून शहराकडे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर आदि कारणांमुळे कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. तथापि, कर्करोग झालेल्या रुग्णांनी घाबरु नये, वेळीच औषधोपचार घ्यावेत, रोज सकस व प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेता आरोग्य या विषयासाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता जागांची संख्या वाढविण्यात आलेल्या आहेत. जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहेत. नागरिकांनी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच गिरिराज हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करुन डॉ. रमेश भोईटे व त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आमदार रोहित पवार यांना त्यांच्या कार्याची दखल घेवून गिरिराज हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या गिरिराज स्पंदन पुरस्कार व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, नागरिकांनी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये तसेच शासनामार्फत आरोग्य विषयक राबविण्यात येणाऱ्या योजना व स्वयंसेवी संस्थांची मदत घेवून वेळीच उपचार करून घ्यावेत. गिरिराज स्पंदन पुरस्काराने सन्मानित केल्याबाबत त्यांनी संस्थेचे आभार मानले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्तन कर्करोगाचे निदान करणाऱ्या सुविधायुक्त मॅमोग्राफी वाहनाचे उद्घाटनही करण्यात आले.प्रास्ताविकात डॉ. भोईटे यांनी गिरिराज हॉस्पिटलमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली आणि कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!