Home महत्वाची बातमी साखरखेर्डा येथे उष्णतेची लाट, 40 अंश तापमानाची नोंद, दैनंदिन जीवन विस्कळीत बाजार...

साखरखेर्डा येथे उष्णतेची लाट, 40 अंश तापमानाची नोंद, दैनंदिन जीवन विस्कळीत बाजार पेठेत शुकशुकाट ,

148

 

अमिन शाह

साखरखेर्डा

ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता लक्षणीय वाढली असून, साखरखेर्डा परिसरात तापमानाने 15 एप्रिल रोजी 40 अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दैनंदिन जनजीवनावर त्याचा स्पष्ट परिणाम जाणवत आहे.
सकाळी ९ वाजताच उन्हाची तीव्रता जाणवू लागते, तर दुपारी एक ते चार वाजण्याच्या सुमारास उष्णतेच्या लाटा अधिक प्रखर होत आहेत. परिणामी, दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
उन्हाच्या झळांचा सर्वाधिक फटका शेतकरी, मजूर तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या घटकांना बसत आहे. सतत उन्हात काम केल्यामुळे थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा आणि डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत.
तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत दुपारच्या
वेळेत बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. यासोबतच पुरेशा
प्रमाणात पाणी, लिंबूपाणी, ताक यांसारख्या द्रवपदार्थांचे सेवन करावे, असेही सांगण्यात आले आहे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे, डोळ्यांसाठी गॉगल लावणे तसेच सैल आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हवामानातील बदलांमुळे यंदा ग्रामीण भागातही उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

तज्ज्ञांचे मत :

वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन, उष्माघात तसेच चक्कर येण्याच्या तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे नियमित जास्त पाणी पिणे, दुपारच्या उन्हापासून दूर राहणे आणि शरीर थंड ठेवण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. घरातून बाहेर पडतांना डोक्याला दस्ती रुमाल घालुनच बाहर पडावे त्रास जानवत असल्यास त्वरित उपचार केंद्रात दाखल व्हावे ,

डॉ. योगेश झाल्टे , डॉ ,किशोर अग्रवाल