Home यवतमाळ कोलाम बांधवांच्या ‘पायदळ लाँग मार्च’ची पालकमंत्र्यांच्या कार्यालयात सांगतामं “मत्री संजय राठोड यांच्याकडून...

कोलाम बांधवांच्या ‘पायदळ लाँग मार्च’ची पालकमंत्र्यांच्या कार्यालयात सांगतामं “मत्री संजय राठोड यांच्याकडून आंदोलनाची दखल’

164
यवतमाळ  –  कोलाम समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी, तसेच ‘शामा दादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग’ स्थापन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी काढण्यात आलेल्या ‘पायदळ लाँग मार्च’ ची सांगता आज सोमवारी यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात झाली.

आदिवासी युवा नेते अतुल आत्राम यांच्या नेतृत्वात आणि शामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंदरे यांच्या पुढाकाराने पांढरकवडा ते यवतमाळ असा हा तीन दिवसांचा खडतर प्रवास पूर्ण करण्यात आला.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे सध्या अधिवेशनानिमित्त मुंबई येथे असल्याने, त्यांच्या वतीने विशेष कार्य अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मोहन जोशी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, गजानन डोमाळे, प्रद्युम्न जवळेकर, दर्शन इंगोले आणि संजय हातगावकर उपस्थित होते.
यावेळी मंत्री संजय राठोड यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधला. कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तुमच्या सर्व रास्त मागण्यांची पूर्ण जाणीव असून, लवकरच मुंबई किंवा यवतमाळ येथे शिष्टमंडळासह प्रशासकीय बैठक आयोजित करून सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
कोलाम समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी ‘शामा दादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग’ स्थापन करावा, प्रत्येक कुटुंबाला ‘पीएम जनमन’ किंवा ‘आदिम आवास’ योजनेतून पक्के घर मिळावे आणि कोलाम पोडांपर्यंत बारमाही रस्ते, पाणी व वीज पोहोचवावी, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘शामा दादा कोलाम शिष्यवृत्ती’ सुरू करावी आणि वस्त्यांवरील मुलांची गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, कोलामी बोलीभाषेचे संवर्धन करण्यासाठी ‘कोलामी साहित्य अकादमी’ची स्थापना करावी आणि यवतमाळ येथे क्रांतीवीर शामा दादा कोलाम यांचे भव्य स्मारक उभारावे, महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज आणि वनोपज प्रक्रिया केंद्रांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
चौकट
आंदोलकांच्या जखमांवर फुंकर
सलग तीन दिवस पायी चालल्यामुळे अनेक कोलाम बांधवांच्या पायाला फोड आले होते. या आंदोलकाची संवेदनशीलतेने दखल घेत, पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांच्या टीमने तत्काळ सर्व आंदोलकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या जखमांची सुश्रुषा केली. या आंदोलनाच्या समारोपाला संजय रंगे, आदिवासी आघाडीचे शैलेश गाडेकर, सुधाकर चांदेकर, भीमराव बोटोनी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.