Home अमरावती बस स्टँड परिसरातील खुनप्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता…!

बस स्टँड परिसरातील खुनप्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता…!

309
अमरावती  – अमरावती येथील बस स्टँड परिसरात २०२२ साली घडलेल्या खुनप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ५ मा. श्री पी. एस. शिंदे यांच्या न्यायालयाने आज हा निर्णय दिला.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १९८/२०२२ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात गंगाधर उर्फ बाळू केशवराव भिरंगे (वय ५० वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. अंजनगाव बारी, अमरावती) यांच्यावर बस स्टँड रोडवरील गभने कॉम्प्लेक्स परिसरात घडलेल्या घटनेत निलेश गणेश खाडे (वय ३२ वर्षे) यांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता.
या प्रकरणात न्यायालयात एकूण १५ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा, रक्ताचे नमुने, शस्त्र व इतर पुरावे सादर करण्यात आले होते.
आरोपीच्या वतीने मुख्य न्यायरक्षक अॅड. जितेंद्र जे. देशमुख (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय, अमरावती) यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद मांडला. त्यांना अॅड. प्रीती मोहता यांनी सहकार्य केले.
न्यायालयात सादर केलेले पुरावे, साक्षीदारांच्या जबान्या आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर अॅड. जितेंद्र जे. देशमुख यांनी केलेला भक्कम युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीविरुद्ध दोष सिद्ध होण्यास पुरेसे ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे नमूद करत आरोपी गंगाधर उर्फ बाळू भिरंगे यांना खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला. या निकालानंतर आरोपीच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.