Home यवतमाळ मारेगावात पत्रकारांवर माहितीबंदी?

मारेगावात पत्रकारांवर माहितीबंदी?

296

पत्रकार संरक्षण समितीचे ठाणेदारांना धडक निवेदन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील घडामोडी, विविध गुन्हे व सामाजिक घटनांची माहिती देण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून स्थानिक पत्रकारांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप करत मारेगाव तालुका पत्रकार संरक्षण समितीने थेट पोलीस ठाणे गाठत ठाणेदारांना धडक निवेदन दिले.

तालुक्यात घडणाऱ्या विविध घटना व गुन्ह्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत असतात. या तक्रारींच्या आधारे पत्रकार बांधव आपल्या माध्यमांतून समाजापर्यंत वस्तुस्थिती पोहोचवण्याचे काम करतात. पत्रकारिता ही समाजाचा चौथा स्तंभ मानली जाते. मात्र, याच चौथ्या स्तंभाला माहिती मिळत नसल्याचा आरोप होत असल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

काही पत्रकार प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा भ्रमनध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती विचारतात. मात्र “तक्रार अद्याप दाखल झालेली नाही” किंवा “ही माहिती देता येणार नाही” असे उत्तर काही कर्मचाऱ्यांकडून दिले जाते, असा समितीचा आरोप आहे. विशेष म्हणजे, याच घटनांची सविस्तर बातमी बाहेरील पत्रकारांच्या वृत्तपत्रांत किंवा ऑनलाईन पोर्टलवर झळकत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

“बाहेरील पत्रकारांना माहिती दिली जाते, पण तालुक्यातीलच पत्रकारांना का डावलले जाते?” असा थेट सवाल समितीने निवेदनातून उपस्थित केला आहे. स्थानिक पत्रकारांना सम्मान व पारदर्शक पद्धतीने माहिती देण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा मार्गदर्शक मोरेश्वर ठाकरे, तालुका अध्यक्ष भैय्याजी कनाके, सचिव सुरेश पाचभाई, कार्याध्यक्ष सुरेश नाखले, माजी तालुका अध्यक्ष सुमित हेपट, भास्कर राऊत, शरद खापणे, सचिन मेश्राम आदी उपस्थित होते.दरम्यान, या निवेदनानंतर पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.