Home यवतमाळ शिरपूर–वणी मार्गावर ड्रग्स तस्करीचा भांडाफोड ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात 56 ग्रॅम...

शिरपूर–वणी मार्गावर ड्रग्स तस्करीचा भांडाफोड ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात 56 ग्रॅम एमडी जप्त; सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

580

वणी / प्रतिनिधी – शिरपूर–वणी मार्गावर बुधवारी सायंकाळी शिरपूर पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला. चारचाकी वाहनातून ड्रग्सची वाहतूक करणाऱ्या पुनवट येथील तरुणाला रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ₹5.60 लाखांचे एमडी ड्रग्स व वाहनासह एकूण ₹9.82 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वणी परिसरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी ड्रग्स कारवाई मानली जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रेयस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील (वय 24, रा. पुनवट, ता. वणी) असे आहे. तो सध्या नागपूर येथे वास्तव्यास असून वणी व शिरपूर परिसरात एमडी ड्रग्सची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. तो नागपूरहून पुनवटमार्गे वणीला ड्रग्स डिलिव्हरीसाठी जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
चारगाव चौकी ते वणी रोडदरम्यान एका शेताजवळ सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास सापळा रचण्यात आला. संशयित Datsun Go (MH 32 AH 4126) वाहन थांबवून झडती घेतली असता आरोपीच्या जिन्सच्या खिशात व वाहनातील ड्रॉवरमध्ये तीन प्लास्टिक पिशव्यांत पांढरट-पिवळसर रंगाची संशयास्पद पावडर आढळून आली. तपासणीअंती ती एमडी (मेफेड्रोन) असल्याचे स्पष्ट झाले. वजन केल्यावर ड्रग्स 56.25 ग्रॅम निघाले.
याशिवाय वाहनातून तीन डिजिटल तराजू व एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने हा ड्रग्स नागपूर येथील एका सप्लायरकडून घेतल्याचे व वणीतील एका पेडलरकडे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली. त्यामुळे या प्रकरणात नागपूर व वणी येथील आणखी दोघांचा सहभाग उघड झाला आहे.
या प्रकरणी आरोपीसह तिघांविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. नागपूर–वणी दरम्यान सक्रिय असलेल्या ड्रग्स रॅकेटचा आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात पार पडली. या धाडीत उपनिरीक्षक धीरज गुल्हाणे, हेड कॉन्स्टेबल सूरज साबळे, कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे, इक्बाल शेख, प्रशांत झोड, परमेश्वर दराडे, किरण सोबत आदींनी सहभाग घेतला. पंचनामा प्रक्रियेसाठी नायब तहसीलदार उल्हास निमेकर यांची उपस्थिती होती.आरोपीला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे