Home यवतमाळ यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला आज 11 फेब्रुवारीपासून सुरुवात, 150 पदांसाठी...

यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला आज 11 फेब्रुवारीपासून सुरुवात, 150 पदांसाठी 12 हजारांहून अधिक अर्ज

527
यवतमाळ – यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील सन 2024-25 या कालावधीतील पोलीस शिपाई संवर्गातील 150 पदे तसेच बँड्समन संवर्गातील 11 पदांसाठी भरती प्रक्रिया बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. ही प्रक्रिया पळसवाडी पोलीस कवायत मैदान, दक्षता भवनजवळ, दारव्हा रोड येथे सकाळी 4 वाजल्यापासून पार पडणार आहे.
पोलीस शिपाई पदासाठी 11 ते 23 फेब्रुवारीदरम्यान शारीरिक मैदानी चाचण्या घेण्यात येणार असून बँड्समन पदासाठी 24 व 25 फेब्रुवारी रोजी चाचण्या होणार आहेत. शिपाई पदांसाठी एकूण 12,093 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 8,744 पुरुष, सुमारे 2,500 महिला तसेच 849 खेळाडू व माजी सैनिकांचा समावेश आहे. बँड्समनच्या 11 पदांसाठी 1,687 अर्ज आले असून त्यात 1,000 पुरुष आणि 687 खेळाडू व माजी सैनिक उमेदवार आहेत.
पहिल्या दिवशी शारीरिक चाचणीसाठी 750 उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी सर्व प्रशासकीय आणि सुरक्षा तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 60 अधिकारी, 410 पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी 10 फेब्रुवारी रोजी भरती प्रक्रियेचा आढावा घेत संपूर्ण बंदोबस्ताची रंगीत तालीम केली. शारीरिक व मैदानी चाचण्यांसाठी नियुक्त पथकांची तपासणी करून त्यांनी पारदर्शकतेची खात्री केली.
या भरती प्रक्रियेत RFID या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ चित्रीकरणाखाली होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवा, भुलथापा किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.