Home यवतमाळ पिंपळखूटा येथील जिल्हा परिषद शाळेत ‘सिखें उत्सव’

पिंपळखूटा येथील जिल्हा परिषद शाळेत ‘सिखें उत्सव’

232

विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाने पालक भारावले

यवतमाळ – बाभूळगाव तालुक्यातील पिंपळखूटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच ‘सिखें इंडिया उत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि वर्षभरातील त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘सिखे रॅली’ काढून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर शाळेत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कामिनी घोंगडे, प्रवीण घोंगडे, प्रफुल्ल इंगळे, मुख्याध्यापक मनोज श्रीवास, ‘सिखें’चे सहायक जिल्हा व्यवस्थापक नितीन पखाले आदी उपस्थित होते.

सिखेंच्या वतीने शाळेत भाषा आणि गणित विषयावर शिक्षकांसोबत काम केले जाते. तर विद्यार्थ्यांना कार्यपुस्तिका देवून विविध घटक शिकवले जातात. या उपक्रमात विद्यार्थी वर्षभर काय शिकले याचे विविध मॉडेल विद्यार्थी प्रदर्शनातून मांडतात. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गणितातील अपूर्णांकाच्या विविध संकल्पना, भाषेतील गोष्टीचे घटक, पुस्तक अशा विषयांवर आधारित प्रकल्प सादर केले. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी अतिशय समर्पक आणि आत्मविश्वासाने उत्तरे दिली. पाल्यांची प्रगती आणि त्यांचा बोलका आत्मविश्वास पाहून पालकांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर न करता विषयाची मूळ संकल्पना सखोलपणे समजून घेतली व त्याचे सादरीकरण केले तसेच गणितातील कठीण भागही दृश्यमान स्वरूपात सहजपणे समजावून सांगितला, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. संचालन शिक्षिका श्रद्धा चौरे यांनी केले. प्रदर्शनीसाठी सिखेंचे जिल्हा व्यवस्थापक संभाजी भिसे यांच्या मार्गदर्शनात कोच गोवर्धन गुल्हाने यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.