Home यवतमाळ वकिलाला चाकू-पिस्टल दाखवून जीवे मारण्याची “धमकी” यवतमाळात उडाली खळबळ…!

वकिलाला चाकू-पिस्टल दाखवून जीवे मारण्याची “धमकी” यवतमाळात उडाली खळबळ…!

283
यवतमाळ शहरात कायदा व्यवसाय करणारे ॲड. निशांत अरविंद तायडे यांना अज्ञात व्यक्तींनी चाकू व पिस्टलसारखे शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना ६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या प्रकरणी संबंधित अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला योग्य पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ॲड. निशांत तायडे यांच्या घरासमोर हुंडई कंपनीची चारचाकी कार (नोंदणी क्रमांक एम.पी. ०९ सी.ई. ३३३९) येऊन थांबली. सदर वाहनातून चार ते पाच इसम उतरून दारूच्या नशेत आरडाओरड करीत होते. यावेळी ॲड. तायडे यांची मुलगी घरात अभ्यास करीत असल्याने तिच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत होता.
त्यामुळे ॲड. तायडे यांनी घरातूनच वाहन थोडे पुढे घेण्याची विनंती केली असता, वाहनातील इसम चिडले. दारूच्या नशेत त्यांनी शिवीगाळ करत “तू बाहेर ये, तुला मारून टाकतो” अशी धमकी दिली. यावेळी त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या हातात चाकू तर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पिस्टलसारखे शस्त्र असल्याचे ॲड. तायडे यांनी सांगितले आहे. आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवत घराबाहेर येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
ॲड. तायडे घराबाहेर न आल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांच्या घरावर दगडफेक केली व तेथून पळ काढला. मात्र अवघ्या दहा मिनिटांनंतर ते पुन्हा घटनास्थळी परत आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. त्यामुळे घाबरलेल्या ॲड. तायडे यांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. तोपर्यंत आरोपी कारसह घटनास्थळावरून निघून गेले.
काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ॲड. तायडे यांनी संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले. मात्र, अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविताना संबंधित पोलीस अधिकारी श्री. बुधेवार यांनी अपेक्षित सहकार्य न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ११२ वर कॉल केल्यानंतर पोलीस वेळेवर न पोहोचल्याचा मुद्दा उपस्थित केल्यावर समाधानकारक उत्तर न देता उद्धटपणे वागणूक देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की, जर त्या वेळी पोलिसांनी तातडीने हालचाल करून परिसरात नाकाबंदी केली असती, तर आरोपींचा शोध लागणे शक्य होते. या घटनेनंतर ॲड. निशांत तायडे व त्यांचे कुटुंबीय दहशतीखाली असून त्यांना जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश द्यावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांना सादर करण्यात आले. यावेळी ॲड. जयसिंग चव्हाण, ॲड. विपिन ठाकरे, ॲड. इमरान देशमुख, ॲड. मोहन गिराटकर, ॲड. मनमोहन ठाकरे, ॲड. तुषार देशपांडे, ॲड. प्रशांत कोल्हे, ॲड. प्रविण हर्षे यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.
या घटनेमुळे शहरातील वकील वर्गात तीव्र संतापाची भावना असून, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.