Home यवतमाळ पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे मतिमंद तरुणीला मिळाला आधार; ‘नंददीप’ संस्थेत केले स्वाधीन

पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे मतिमंद तरुणीला मिळाला आधार; ‘नंददीप’ संस्थेत केले स्वाधीन

86
यवतमाळ (प्रतिनिधी) – मोहदा येथे माणुसकीचे दर्शन घडवत पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी एका मतिमंद व बेवारस महिलेचे प्राण वाचवून तिला सुरक्षित आश्रय मिळवून दिल्याची घटना सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेल्या या कार्यामुळे मोहदा परिसरात संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण झाला आहे.

मोहदा येथे सुमारे २२ वर्षीय एक मतिमंद महिला रस्त्याने दिशाहीन अवस्थेत फिरताना नागरिकांच्या निदर्शनास आली. तिची अवस्था पाहून काही जागरूक नागरिकांनी याबाबत तात्काळ पोलीस पाटील पियुष गबराणी यांना माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी वेळ न दवडता सामाजिक कार्यकर्ते अमीर कडीवार यांच्याशी संपर्क साधून त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान सदर महिला आसोली रोड परिसरात फिरत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी स्वतःच्या खर्चाने वाहनाची व्यवस्था करून त्या महिलेचा सुरक्षितरीत्या ताबा घेतला. तिच्या सुरक्षिततेचा विचार करून तिला यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आले. नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे यांनी सदर महिलेला स्वीकारून तिच्या उपचार, निवारा व काळजीची जबाबदारी घेतली.
ही महिला रस्त्यावर फिरत असल्याने तिच्याबाबत गैरप्रकार घडण्याची किंवा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस पाटील पियुष गबराणी यांच्या तत्परतेमुळे आणि माणुसकीच्या दृष्टिकोनामुळे एक अनर्थ टळला. या अगोदरही त्यांनी अनेक बेवारस व मतिमंद महिलांना नंददीप फाउंडेशनमध्ये पोहोचवले असून, रस्त्यावरील अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल करण्यास नेहमी पुढाकार घेतला आहे.
पोलीस पाटील हे केवळ प्रशासकीय कामापुरते मर्यादित न राहता समाजहितासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होत असून समाजातील दुर्बल घटकांसाठी ते आधारस्तंभ ठरत आहेत.
या प्रसंगी नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे, पोलीस पाटील पियुष गबराणी, सामाजिक कार्यकर्ते अमीर कडीवार तसेच इकबाल शेख उपस्थित होते. मोहदा परिसरातील नागरिकांनी पोलीस पाटील यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.
माणुसकी, संवेदनशीलता आणि समाजसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या या घटनेमुळे मोहदा तालुक्यात एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे.