
अमीन शाह
वीस दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापूरात घडली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या महिलेच्या मृत्यूचं कारण समजणार आहे. संभाजीनगरमधील जुनी मोरे कॉलनी या ठिकाणी ही घटना घडली. बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
रचना चौगले (वय-२७) असं या महिलेचं नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. रचना या आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा आणि स्वप्निल यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना सहा वर्षांची मोठी एक मुलगी आहे. तर २० दिवसांपूर्वी त्यांना दुसरी मुलगी झाली होती. कुटुंबीयांनी छोट्या मुलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केला मोठा थाटमाट झाला. आठवड्यापूर्वीच तिचं बारसं देखील घालण्यात आलं होतं. तिचं पीयूषा असं नाव ठेवलं. माय लेकी दोघींची तब्येत अगदी व्यवस्थित होती.
पहाटे पाचच्या सुमारास रचना मुलीला दूध पाजत असतानाच काही वेळाने मुलगी रडू लागली. त्यानंतर पती स्वप्निल यांनी उठून पत्नीला हलवण्याचा प्रयत्न केला, तर त्या बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने पत्नीला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथून सीपीआरमध्ये हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. बाळाला दूध पाजत असताना काळाने घाला घातला आणि चिमुकली आपल्या आईपासून दुरावली. रचनाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










































