Home कोल्हापूर मृत्युला देखील हेवा वाटेल असे जीवन जगा – पद्मश्री डॉ. हिंमतसिंह बावस्कर

मृत्युला देखील हेवा वाटेल असे जीवन जगा – पद्मश्री डॉ. हिंमतसिंह बावस्कर

55

सुमंगलम लोकोत्सव जगाला आरोग्यदायी दिशा देणारा ठरेल

सविता माने –  गारगोटी/कोल्हापूर
मृत्युला देखील हेवा वाटेल असे जीवन जगा. सुमंगलम लोकोत्सव जगाला आरोग्यदायी दिशा देणारा ठरेल असे प्रतिपादन पद्मश्री डॉ हिंमतसिंह बावस्कर यांनी सिध्दगिरी कणेरी मठ कोल्हापूरच्या सुमंगलम् लोकोत्सवानिमित्य आयोजित केलेल्या व्याख्यानात केले.
सिद्धगिरी मठ, कणेरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव येथे पहिल्या दिवशीच्या आरोग्य विषयक सत्रात पहिले पुष्प गुंफताना जागतिक किर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यावेळी बोलताना पुढे म्हणाले, की,”आज अन्न,वस्त्र, निवारा या गरजा भागवण्याकरिता अनेक साधने आहेत, तसेच शैक्षणिक गरजा हि पूर्ण करण्यासाठी विविध साधने आहेत, पण आरोग्य विषयक संपन्नता हि बाजारात कुठे हि विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. त्यामुळे आरोग्य हा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे. लहान बाळाची बौद्धिक वाढ हि किमान पाच वर्षापर्यंत होत असते त्यामुळे या काळात त्याला पाळणा घर अथवा इतरांच्याकडे सोपवणे योग्य नाही, पाच वर्षापर्यंत त्याला आईचा सहवास मिळणे त्याच्या बौद्धिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या फास्टफूडच्या अतिरिक्त सेवनाने आरोग्याचा तोल ढासळून तणाव पूर्ण जीवन वाढत आहे. माणसाला अनेक प्रकारची व्यसने आज जडली आहेत, यात केवळ दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसने प्रचलित असली तरी याशिवाय हि अनेक व्यसने आहेत, अगदी खोट बोलणे यासारखी व्यसने आहेत. आज मधुमेह, कमी वयातील ह्रदयविकारांचे वाढते प्रमाण, अनेक आजारांचे प्रमाण हे व्यायामाच्या आभावाची लक्षणे आहेत. शाररीक व्यायामासोबत मानसिक स्वास्थ्य हि सदृढ होणे गरजेचे आहे. आजच्या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे हि शरीराचे न भरून येणारे नुकसान होत आहे, ते दुर्लक्षून चालणार नाही. मोबाईलच्या वापरामुळे कानाच्या कॅन्सरसोबतच माणसातील संवाद अतिशय दुर्मिळ होत आहे. घरातील माणसे या मोबाईल मुळे अगदी घरात होणारा संवाद हि दुर्मिळ होत आहे. याशिवाय स्मृतीभ्रंश सारख्या समस्या वाढत आहेत.
सिद्धगिरी मठावर होणारा पर्यावरण व आरोग्याचा जागर हा जगाला परिपूर्ण आरोग्याची दिशा देणारा ठरणार आहे. नैसर्गिक सोई सुविधा,आहार विहार विचार आचरणात आणल्यास चांगल्या जगण्या बरोबरच सुखद मृत्यू देवू शकतो. आरोग्य हे बाजारात विकत मिळत नाही ते स्वतःलाच कमवावे लागते त्यामळे वेळीच पर्यवरण व आरोग्याकडे लक्ष द्या अन्यथा विनाश व्हायला खूप वेळ लागणार नाही असा इशारा दिला. तसेच आठवड्यातून किमान एक दिवस मोबाईलचा वापर टाळण्याची कृती आमलात आणावी, अतिरिक्त विचाराना विराम देवून अध्यात्म ज्ञान याचा संगम साधल्यास जीवन परिपूर्ण करण्यास मदत होईल.” असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी मुख्य मंडपात आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी व्यासपीठावर सुरेंद्र जैन, हरीश बोटले , विनय हसबनीस, प्रकाश पाटील उपस्थित होते. डॉ. संदीप पाटील पाटील यांनी यावेळी स्वागत केले. यावेळी सुमंगलम उत्सवाला भेट देणाऱ्या असंख्य लोकांनी या व्याख्यानाचा लाभ सभामंडपासोबतच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून घेतला.