
चांगल्या नेतृत्वाच्या निवडीने घाटंजीत आनंदोत्सव..
—————————————-
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्हा शाखा ग्राम पंचायत अधिकारी संघटना डी. एन. ई. १३६ ची पंचवार्षिक निवडणूक दिनांक २० जुलै २०२५ ला यवतमाळ जिल्हा शाखेच्या संघटना कार्यालयात मुख्य निवडणूक निरीक्षक तथा राज्याचे संयुक्त सचिव कमलाकर वणवे, सह निवडणूक निरीक्षक तथा अमरावती विभागाचे सहसचिव चाँद कुरेशी व निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव मस्के यांच्या नेतृत्वात पार पडली. यात घाटंजी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी मंगेश गाऊत्रे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६ च्या यवतमाळ जिल्हा सरचिटणीस पदी अविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत अधिकारी यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारता यावा.सेवेत येणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडविता याव्यात यासह विविध दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६ यवतमाळ जिल्हा शाखेची सन २०२५/०२६ ते २०३०/३१ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया संघटनेच्या घटनेनुसार रितसर सर्व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून यवतमाळ जिल्ह्यातील संघटनेचे सन्मानिय तालुका अध्यक्ष व तालुका सचिव यांनी उपस्थिती दर्शवून जिल्ह्याच्या कार्यकारणीला पसंती देत निवड केली. यामध्ये कुशल नेतृत्व असणारे, कार्यतत्पर असे परिचित असणारे घाटंजी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असणारे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश गाऊत्रे यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून अविरोध निवड करण्यात आली.
आपली निवड ही संघटनेसाठी भरिव कार्यासाठी असून ग्रामपंचायत अधिकारी यांच्या न्याय हक्कासाठी आहे. सोबतच आपल्यावर संघटनेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस मंगेश गाऊत्रे यांनी बोलून दाखविले असून संघटनेचे आणि तालुका अध्यक्ष व तालुका सचिव यांचे मनोमन आभार मानले आहे. या निवडीने घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी व त्यांच्या चाहत्यामध्ये आनंद संचारला असून गाऊत्रे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे.












































