Home यवतमाळ अवैध विट भट्टी व खाण उत्खनन प्रकरणी मनसेच्या शिक्षामंडळाची महसूल मंत्र्यांना; कडक...

अवैध विट भट्टी व खाण उत्खनन प्रकरणी मनसेच्या शिक्षामंडळाची महसूल मंत्र्यांना; कडक कारवाईची मागणी

333

यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध विट भट्टी व यवतमाळ तालुक्यातील खदानीतून होणाऱ्या अवेद्य उत्खनन विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यात सध्या २०० हून अधिक विट भट्ट्या बिनपरवाना व नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत. शासनाच्या २०१६ च्या विट भट्टी नियमानुसार परवाना घेणे बंधनकारक असताना, या सर्व भट्ट्या नियम झुगारून विना चिमणीच्या चालवल्या जात असून, मोठ्या प्रमाणावर माती व पोयटा यांचे अवैध उत्खनन सुरू आहे. यामुळे पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास होत असून नैसर्गिक संसाधनांचा विनाश होत आहे, असा आरोप नानवटकर यांनी केला.

अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदने दिली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विट भट्ट्यांप्रमाणेच यवतमाळ तालुक्यातील गिट्टी क्रशर आणि खाण उद्योगांवरही कारवाईची गरज असून, अनेक खाणींची परवाने संपलेले असतानाही उत्खनन सुरूच असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

दररोज हजारो ब्रासचे अवैध उत्खनन सुरू असून, यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यासोबतच पाण्याची टंचाई, प्रदूषण व रस्त्यांचे हालही वाढले आहेत.

*या पार्श्वभूमीवर, महसूल मंत्री बावनकुळे यांनी “कलेक्टर यांनी संपूर्ण उत्खननाचे द्रोण सर्वेक्षण पुणे मॉडेलप्रमाणे करावे”, तसेच “विट भट्ट्यांवर थेट स्पॉट व्हिजिट करावी” अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.*

अभिजीत नानवटकर यांनी पुढील आठ दिवसांत ETS व इन-कॅमेरा तपासणीसह सार्वजनिक बांधकाम आणि भूमिअभिलेख विभागाच्या उपस्थितीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. खाणधारकांकडून प्रलंबित स्वामित्वधन व जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी वसूल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.

> “शासनाची संपत्ती आणि पर्यावरणाचा विनाश रोखणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. यासाठी पुढील टप्प्यात आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी दिला.

या प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळा साहेब कठाळे, यवतमाळ शहर अध्यक्ष अमित बदनोरे, शहर उपाध्यक्ष प्रथमेश पाटील , साईराम कवडे, अमितेश आडे यांच्यात सह पदाधिकारी उपस्थित होते