Home यवतमाळ लोही ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवकांच्या बदली विरोधात ग्रामस्थ आक्रमक; कायम नियुक्तीची मागणी

लोही ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवकांच्या बदली विरोधात ग्रामस्थ आक्रमक; कायम नियुक्तीची मागणी

668

यवतमाळ : मौजा लोही येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री. विद्याधर चौधरी यांच्या प्रस्तावित बदलीच्या चर्चेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांना निवेदन सादर करून चौधरी यांची लोही ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले की, श्री. चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यापासून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांनी पारदर्शक व्यवहार, सौजन्यपूर्ण वागणूक व गावाच्या गरजांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे. सन २०२५-२६ साठी त्यांनी जाहीर केलेल्या विकास योजनांची गावकरी विशेष प्रशंसा करत आहेत.

गावाच्या इतिहासात असे काम कोणत्याही ग्रामसेवकाने केले नसल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. सध्या तीन गावांचा कार्यभार सांभाळताना देखील श्री. चौधरी लोही ग्रामपंचायतीला प्राधान्य देत असल्यामुळे त्यांच्या बदलीमुळे ग्रामविकासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना केलेल्या निवेदनाद्वारे चौधरी यांची लोही येथेच कायम नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.